महाळुंगे इंगळे गावात एका तरुणाचा खून, तर एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 00:03 IST2023-11-27T00:03:18+5:302023-11-27T00:03:40+5:30
फरारी आरोपींच्या शोधासाठी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याची पोलीस पथके रवाना झाले आहेत.

महाळुंगे इंगळे गावात एका तरुणाचा खून, तर एक गंभीर जखमी
चाकण : चाकण औद्योगिक वसाहतमधील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या श्रीक्षेत्र महाळुंगे ( ता खेड ) येथील गजबजलेल्या भर चौकात एका २४ वर्षीय तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून निर्घृन खून करण्यात आला असून, एक जण गंभीर जखमी झाला असल्याची धक्कादायक घटना आज (दि.२६) सकाळी साडे अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,रितेश संजय पवार ( वय.२४ वर्षे,रा.महाळुंगे, ता.खेड ) नामक तरुणाच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार करून आणि लाकडी दांडक्याने जबरी मारहाण झाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.तर खून झालेल्या तरुणाचा मित्र संदेश भोसले याला मारहाण करण्यात आल्याने तोही जखमी झाला आहे. चाकण तळेगाव महामार्गावरील रेणुका हॉटेल समोरील चौकात महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावरील हा खून झाला असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर आणि त्यांचे सहकारी दाखल झाले आहेत. फरारी आरोपींच्या शोधासाठी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याची पोलीस पथके रवाना झाले आहेत.