सरकारी नोकरीसाठी पत्नीनं पतीला संपवलं?; दफन केलेला पतीचा मृतदेह बाहेर काढला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 14:39 IST2025-02-05T14:38:36+5:302025-02-05T14:39:06+5:30
सुरेश मोलकालमुरू तालुक्यातील तहसील कार्यालयात कामाला होता. त्याचा पत्नीसोबत वाद सुरू होता त्यामुळे तो आई आणि घरच्यांपासून वेगळा राहायचा

सरकारी नोकरीसाठी पत्नीनं पतीला संपवलं?; दफन केलेला पतीचा मृतदेह बाहेर काढला अन्...
कर्नाटकच्या चित्रदुर्ग इथं हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका महिलेवर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. पतीच्या मृत्यूनंतर ४ महिन्यांनी हा खुलासा उघड झाला. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपासासाठी दफन केलेला मृतदेह बाहेर काढून पोस्टमोर्टमला पाठवला. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.
मृत व्यक्तीच्या आईने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. त्यात म्हटलं की, माझ्या मुलाची हत्या करण्यात आली होती. मुलाच्या पत्नीने हे कृत्य केले असा आरोप तिने केला. मृत पतीचं नाव सुरेश होते आणि तो नेहरू नगरचा रहिवासी होता. त्याचे वडील सरकारी नोकरीत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर सुरेश अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरीत लागला. सुरेशच्या आईने पतीची नोकरी मुलाला दिली जेणेकरून मुलाचं आयुष्य चांगले होईल.
माहितीनुसार, सुरेश मोलकालमुरू तालुक्यातील तहसील कार्यालयात कामाला होता. त्याचा पत्नीसोबत वाद सुरू होता त्यामुळे तो आई आणि घरच्यांपासून वेगळा राहायचा. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरेशचा मृत्यू झाला त्यावेळी घरच्यांना काही न कळवता पत्नी नागरत्नाने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. जेव्हा ही गोष्ट घरच्यांना कळली तेव्हा सुरेश आजारी पडला होता त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचं पत्नीने सांगितले.
सरकारी नोकरीच्या लालसेपोटी हत्येचा आरोप
दरम्यान, सून नागरत्नाने माझ्या मुलाची हत्या केली असा आरोप मृत सुरेशच्या आईने केला. नागरत्नाने माझ्या मुलाची हत्या करून त्याला आजार झाल्याचं सांगत नाटक करत होती. पतीची सरकारी नोकरी मला मिळेल या हेतूने तिने हत्या केली. याबाबत मृताच्या घरच्यांनी पोलीस आणि लोकायुक्त कार्यालयात तक्रार केली आहे. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या ४ महिन्यांनी पोलिसांनी क्रबिस्तानात दफन केलेला सुरेशचा मृतदेह बाहेर काढून पोस्टमोर्टमला पाठवला आहे.