४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 12:05 IST2025-09-15T12:04:29+5:302025-09-15T12:05:44+5:30

मयुरी ही उच्चशिक्षित होती, तिचे बीएससी ऍग्रीपर्यंत शिक्षण झाले होते. ती खंबीर असल्याने आत्महत्या करूच शकत नाही असा ठाम विश्वास मयुरीच्या बहिणीने व्यक्त केला आहे

In Buldhana, Suspicious death of a married woman who was married 4 months ago; Was she tortured and murdered for dowry? | ४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 

४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 

बुलढाणा - जळगावात गौरव ठोसर या तरुणासोबत ४ महिन्यांपूर्वी १० मे २०२५ ला लग्न झालेल्या मयुरी बुडुकले या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. हुंड्याच्या मागणीवरून सासरच्यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप मयुरीच्या घरच्यांनी केला आहे. मयुरीने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आला आहे असा गंभीर आरोप पीडित मुलीच्या कुटुंबाने केला आहे. 

याबाबत मयुरीचे वडील भगवान बुडुकले म्हणाले की, १० मे रोजी माझ्या मुलीचे लग्न गौरवशी झाले होते. लग्नात ठरल्याप्रमाणे पाच लाख रुपये हुंडा देण्यात आला. मात्र लग्नाच्या एक महिन्यानंतर मेडिकल टाकण्यासाठी स्वतःची दुकान घ्यायचंय असं सांगत तिच्या सासरच्यांनी १० लाखांची मागणी केली. या हुंड्यासाठी मयुरीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला. त्यामुळे कशीबशी ८ लाखांची जुळवाजुळव करून आम्ही ही रक्कम मयुरीच्या सासरच्यांना दिली, त्यानंतर उर्वरित २ लाख काही दिवसांनी देऊ असं सांगितले. मात्र पैशांसाठी मुलीच्या मागे तगादा सुरूच होता. घटनेच्या दिवशी दुपारी एक ते दीड वाजता मयुरीसोबत बोलणे झाले होते. त्यानंतर अचानक आम्हाला कॉल आला आणि तुमच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय मयुरीच्या मृत्यूनंतर सर्व नातेवाईकांनी ताबडतोब जळगावचं रुग्णालय गाठले. मात्र त्या ठिकाणी सासरच कोणीही हजर नव्हते आणि मृतदेह दवाखान्यात बेवारसपणे ठेवल्याचे सांगण्यात आले. या प्रकारानंतर नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये धडक देत आपल्या मुलीची हत्या करण्यात आल्याची तक्रार नोंदवली.  पोलिसांनी सहकार्य न करता तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. अंगावर तक्रारीची प्रत फेकून गैरवर्तणूक केल्याचा आरोप मयुरीच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. मयुरी ही उच्चशिक्षित होती, तिचे बीएससी ऍग्रीपर्यंत शिक्षण झाले होते. ती खंबीर असल्याने आत्महत्या करूच शकत नाही असा ठाम विश्वास मयुरीच्या बहिणीने व्यक्त केला आहे. शिवाय मयुरीच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आणि वणदेखील पाहिल्याचं कुटुंबाने म्हटलं. 

दरम्यान, मयुरीची आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा खून केला आहे. आरोपीला पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केला. या प्रकरणाचा तपास जळगाव पोलिसांकडून काढून एसआयटी मार्फत करण्यात यावा अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. गायकवाड या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेणार आहेत. 
 

Web Title: In Buldhana, Suspicious death of a married woman who was married 4 months ago; Was she tortured and murdered for dowry?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.