पटना - बिहारच्या ग्राम विकास विभागात काम करणाऱ्या इंजिनिअर विनोद कुमार रायच्या ठिकाणांवर आर्थिक गुन्हे शाखेने धाड टाकली आहे. पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी EOU पथकाने त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी धाडीत टीमला ३५ लाखांची रोकड आणि २० लाख रूपये जळालेल्या अवस्थेत सापडले. त्याशिवाय कोट्यवधीच्या जमिनीचे कागदपत्रे, १२ हून अधिक बँक डिपॉझिट आणि लाखोंचे सोने चांदीचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.
विनोद कुमार यांच्या पत्नीने तपास यंत्रणेच्या पथकाला धाड मारण्यापासून काही तास अडवून ठेवले होते. संपूर्ण रात्र हे पथक विनोद कुमारच्या घराबाहेर वाट पाहत होते परंतु पहाटे टीमने घरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच विनोद कुमार यांच्या पत्नीने लाखो रुपयांची रोकड जाळण्याचा प्रयत्न केला. अर्धवट अवस्थेत जळालेल्या या नोटा तपास यंत्रणेने जप्त केल्या. त्यानंतर इतर यंत्रणांनाही घटनास्थळी बोलवण्यात आले. या कारवाईवेळी विनोद कुमार यांना एका खोलीत नजरकैदेत ठेवले होते.
विनोद कुमारच्या घरी तपास यंत्रणेला ३५ लाख रोकड सापडली. तर त्यांच्या पत्नीकडून काही रोकड जाळण्यात आली. त्या जळालेल्या नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत. अवैध मार्गाने मिळवलेल्या कमाईतून सोन्याची बिस्किटे, लाखोंचे दागिने बनवण्यात आले होते. एका गुप्त माहितीनुसार विनोद कुमारच्या पटना येथील भूतनाथ रोडवरील घरात कोट्यवधी रोकड असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा तपास यंत्रणेचे पथक विनोद कुमारच्या घरी पोहचले. परंतु पत्नीने खूप उशीर दार उघडले नाही आणि आरडाओरड करू लागली. रात्रभर अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या घराबाहेर वाट पाहत राहिले.
जेव्हा पहाटे ५ च्या सुमारास घरातून आगीचा धूर दिसू लागला तेव्हा तपास यंत्रणेचे पथक बळजबरीने घरात घुसले तेव्हा आतील दृश्य पाहून धक्का बसला. घरात २० लाखांची रोकड जाळण्यात येत होती, या नोटांना आग लावून त्या गटारात टाकण्यात येत होत्या. तातडीने घरातील सगळ्यांना ताब्यात घेत तपास यंत्रणेने आग विझवली. त्यानंतर केलेल्या कारवाईत ३५ लाखांची रोकड सापडली. तपासात कोट्यवधीचे जमीन व्यवहार केलेले कागदपत्रे, दागिने सापडले. सोबतच मोठ्या प्रमाणात अर्धवट जळालेल्या नोटाही सापडल्या. सध्या या प्रकरणात पुढील कारवाई सुरू आहे.