प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:04 IST2025-08-12T16:03:59+5:302025-08-12T16:04:28+5:30
युवती बस्ती कोर्टात डेटा फिडिंगचं काम करायची. कोर्टात येता-जाता पोलीस शिपाई आणि संबंधित युवतीची ओळख झाली.

प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
उत्तर प्रदेशच्या बस्ती येथे एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी पोलीस कॉन्स्टेबलने त्याच्या नव्या नवरीचा आयुष्यातून काटा काढला आहे. विशेष म्हणजे १० दिवसांपूर्वीच या दोघांचे लग्न झाले होते. मग १० दिवसांत असे काय घडले ज्यामुळे पोलिस गुन्हेगार बनला हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. सध्या या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
माहितीनुसार, बस्ती परिसरात एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या पोलीस शिपाई गामा निषादने त्याच्या पत्नीवर चाकू हल्ला करत जीव घेतला आहे. हा शिपाई कोतवाली येथे तैनात होता. गामा निषादच्या पत्नीचे नाव माया गौड असे होते. माया बस्ती जिल्ह्यातील पकडी चंदा गावात राहणारी होती. युवती बस्ती कोर्टात डेटा फिडिंगचं काम करायची. कोर्टात येता-जाता पोलीस शिपाई आणि संबंधित युवतीची ओळख झाली. त्यानंतर या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.
१० दिवसांपूर्वीच दोघांनी प्रेमविवाह केला...
या जोडप्याने १० दिवसांपूर्वीच कोर्टात प्रेम विवाह केला होता. परंतु लग्नानंतर काही तासांतच त्या दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्यानंतर १० दिवसांनी गामा निषादने हे क्रूर पाऊल उचलले. रात्री १२ वाजता या दोघांमध्ये भांडण झाले. हे भांडण इतके वाढले की पोलीस शिपायाने रागाच्या भरात भाजी कापणाऱ्या चाकूने पत्नीच्या पोटात सपासप वार केले. या हल्ल्यानंतर जखमी पत्नी रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली. शरीरातून प्रचंड रक्त वाहिल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेची महिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी आरोपी पोलीस शिपायाला अटक केली आणि मृत युवतीच्या कुटुंबाला घटनेची माहिती दिली.
दरम्यान, गामा आणि माया मागील अडीच वर्षापासून बस्ती येथे लिव्ह इनमध्ये राहत होते. १० दिवसांपूर्वीच त्यांनी लग्न केले. लग्नानंतर दोघांनी बस्तीच्या निरंजनपूर परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होते. मायाच्या मृत्यूपूर्वीच दुपारी तिचे वडिलांशी अखेरचे बोलणे झाले होते. २ ऑगस्ट २०२५ रोजी दोघांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र लग्नानंतर गामाने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्यातूनच दोघांमध्ये वाद झाले. त्यातून गामाने पत्नीला कायमचे संपवले. पोलीस या घटनेचा सर्व अँगलने तपास करत आहेत.