पारनेर - दारू पिण्यास विरोध केल्यानं पतीने डोक्यात दगड घालून ६० वर्षीय पत्नीचा खून केला. तालुक्यातील वनकुटे येथील तुकाईमाता मंदिर टेकडीजवळ ही घटना घडली. शनिवारी दुपारी २ वाजता ही घटना उघडकीस आली. ३ ते ५ एप्रिल या दरम्यान हा प्रकार घडल्याचा पोलिसांना अंदाज आहे.
सावित्रा देशमुख असं या मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर मृत महिलेची मुलगी प्रियंका बिलबिले यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बबन देशमुख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिलेचं पोस्टमोर्टम टाकळी ढोकेश्वर येथील रुग्णालयात करण्यात आले. बबन आणि त्याची पत्नी सावित्रा हे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथून मोलमजुरीसाठी वनकुटे येथे आले होते. बबन याला दारूचे व्यसन आहे. सावित्रा त्याला दारू पिण्यास विरोध करत होती. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला.
या वादात दोघांनीही एकमेकांना दगडाने मारहाण केली. यात सावित्रा हिचा मृत्यू झाला. या मारहाणीत बबन जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय दंडगव्हाण करत आहेत.
दारूवरून सातत्याने भांडण
पती बबन सातत्याने दारू पिऊन सावित्रा हिला शिवीगाळ, मारहाण करत होता. दारूवरून या दोघांमध्ये भांडण व्हायची. शनिवारी वनकुटे शिवारातील तुकाई माता मंदिर टेकडीजवळील उघड्या माळावर याच वादातून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यातूनच ही घटना घडली असावी अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मयताच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीत वडील बबन देशमुख यांनी आई सावित्रा हिच्या डोक्यात दगड मारून ठार मारले असल्याचे म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.