परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 08:03 IST2025-04-29T08:03:54+5:302025-04-29T08:03:54+5:30
खून केल्यानंतर पतीचा मृतदेह मोटारसायकलवरून निघोज ते पाबळ रस्त्यावर टाकून पत्नीने अपघाताचा बनाव केल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
अहिल्यानगर - अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करून अपघाताचा बनाव केला. मात्र पारनेर पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल पाहून वेगवेगळ्या अँगलने चौकशी करत हा अपघात नसून खून असल्याची उकल केली. पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली. विशेष म्हणजे प्रियकराला थेट गुजरातमधून अटक करण्यात आली आहे.
पारनेर तालुक्यातील काळेवाडी येथील बाबाजी गायखे असं खून झालेल्या पतीचं नाव आहे. मयताची पत्नी सुप्रिया गायखे आणि जनकभाई भिडभिडिया या दोघांना या प्रकरणी अटक केली आहे. मागील ७ दिवस पारनेरचे पोलीस गुजरातमध्ये ठाण मांडून होते. अखेर गुरुवारी जनकभाईला अटक करण्यात आली. मयताची पत्नी सुप्रिया हिलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रियकर जनकभाई भिडभिडिया याच्या मदतीने अनैतिक प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरणारा पती बाबाजी यांची रविवारी राहत्या घरी डोक्यात हत्यार मारून खून केल्याचे तिने कबूल केले.
खून केल्यानंतर पतीचा मृतदेह मोटारसायकलवरून निघोज ते पाबळ रस्त्यावर टाकून पत्नीने अपघाताचा बनाव केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. मयत बाबाजीच्या मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यात हा मृत्यू अपघाती नसून कोणत्या तरी हत्याराने डोक्यात मारल्याने झाल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आधी पत्नीला अटक केली. त्यानंतर तिने या गुन्ह्याची कबुली दिल्याने फरार प्रियकरालाही गुजरातमधून पकडले. मयताचे वडील शिवाजी गायखे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला होता.
पोस्टमोर्टम रिपोर्टमुळे गुन्ह्याची उकल
जिल्हा रुग्णालयात पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर आला, त्यानंतर पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी वरिष्ठांना माहिती देऊन घटनेच्या तपासासाठी पथक नेमले. मयत राहत असलेल्या ठिकाणाच्या एकूण ३५ सीसीटीव्हीची पाहणी केली. संशयित आरोपींबाबत गोपनीय माहिती घेतली. यात मयताची पत्नी असल्याची खात्री झाली.