तोतया आयकर अधिकाऱ्याला तळोजातून अटक; अनेक बनावट शिक्के व कागदपत्रे सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 09:02 IST2025-01-09T09:02:14+5:302025-01-09T09:02:14+5:30

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसविले

Impersonator Income Tax officer arrested from Taloja Many fake identity cards, stamps and documents found | तोतया आयकर अधिकाऱ्याला तळोजातून अटक; अनेक बनावट शिक्के व कागदपत्रे सापडली

तोतया आयकर अधिकाऱ्याला तळोजातून अटक; अनेक बनावट शिक्के व कागदपत्रे सापडली

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: बीकेसी आयकर विभागात काम करणारा कंत्राटी चालकच तोतया आयकर अधिकारी म्हणून वावरत होता. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट-३च्या पोलिसांनी रिंकू शर्मा (वय ३३) याला मंगळवारी तळोजातून अटक केली. झडती घेतल्यावर त्याच्याकडे अनेक आय कार्ड, बनावट शिक्के, नियुक्तिपत्रे व कागदपत्रे सापडली आहेत. रिंकू शर्माला वसई न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

संतोष भवनच्या तांडापाडा येथील अजमेरी बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सफारुद्दीन खान (वय ४९) यांच्या मुलीला आयकर विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १५ लाखांची फसवणूक केली. आरोपी रिंकू शर्मा व अंशू पासी या दोघांनी त्यांच्या मुलीला आयकर विभागात कामाला लावतो, असे सांगत आयकर विभागाचे ओळखपत्र व ट्रेनिंगचे पत्र देऊन आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी पेल्हारी पोलिसांनी १३ डिसेंबरला गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट- ३ चे पोलिस अधिकारी व अंमलदार करत होते. तपासाच्या दरम्यान रिंकू शर्मा (वय ३३) हा आरोपी तळोजात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. आरोपीला पोलिसांनी मंगळवारी सापळा रचून ताब्यात घेतले. 

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसविले

फसवणूक झालेल्या लोकांनी गुन्हे शाखेच्या कार्यालयात गर्दी केली होती. आतापर्यंत ४० ते ४२ नागरिकांसह सुशिक्षित बेरोजगार तरुण, तरुणींना बनावट आयकर निरीक्षकाचे आय कार्ड व नियुक्तिपत्रे देऊन दोन कोटींपेक्षा अधिक रुपयांना गंडा घातला असल्याचे पुढे आले आहे. आरोपीने कारवर पिवळा अंबर दिवा लावून वसई-विरार परिसरात फिरून २० ते २५ जणांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

Web Title: Impersonator Income Tax officer arrested from Taloja Many fake identity cards, stamps and documents found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.