वृद्धेच्या फ्लॅटवर बेकायदेशीर कब्जा, पोलिसांनी दिला न्यायालयात जाण्याचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 00:49 IST2020-07-09T00:47:26+5:302020-07-09T00:49:02+5:30
जागेच्या मोबदल्यात वयोवृद्ध जागा मालकिणीला दहा वर्षांपूर्वी दिलेल्या फ्लॅटवर बिल्डरने टाळे तोडून बेकायदेशीररित्या कब्जा केल्याची घटना ठाण्यातील करवालोनगर भागात घडली.

वृद्धेच्या फ्लॅटवर बेकायदेशीर कब्जा, पोलिसांनी दिला न्यायालयात जाण्याचा सल्ला
ठाणे : जागेच्या मोबदल्यात वयोवृद्ध जागा मालकिणीला दहा वर्षांपूर्वी दिलेल्या फ्लॅटवर बिल्डरने टाळे तोडून बेकायदेशीररित्या कब्जा केल्याची घटना ठाण्यातील करवालोनगर भागात घडली. याप्रकरणी ८० वर्षीय वृद्धेचा मुलगा हेरॉल्ड कारवालो यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात बिल्डरविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मात्र न्यायालयात जाण्याचा सल्ला दिल्याने बुधवारी याप्रकरणी त्यांनी अल्पसंख्याक आयोगाकडे दाद मागितली आहे.
कारवालोनगर येथील एका भूखंडावर असलेली जुनी चाळ तोेडून त्याठिकाणी प्राची व प्रतीक्षा कन्स्ट्रक्शनचे मालक रवी आणि प्रभाकर सावंत यांनी २०१० मध्ये सात मजली इमारत बांधली. त्यावेळी जमीनमालक म्हणून सिल्विनिया कारवालो यांना त्यांनी १८ मे २०१० रोजी दोन फ्लॅट दिले. तशी रीतसर नोटरीही केली. त्यातील एका फ्लॅटची कारवालो यांनी विक्री केली. तर दुसरा फ्लॅट भाड्याने दिला होता. गेल्या दहा वर्षांत पाच भाडेकरू त्यांनी ठेवले. अखेरच्या भाडेकरूने २५ जून २०२० रोजी रीतसर करार संपल्याने फ्लॅट रिकामा केला. दुसऱ्याच दिवशी कारवालो यांच्याकडील कर्मचारी साफसफाईसाठी या फ्लॅटवर गेला तेव्हा तिथे फ्लॅटचे टाळे तोडून बिल्डर प्रभाकर सावंत यांनी पत्नी आणि दोन मुलींसह जबरदस्तीने तिथे वास्तव्याला आल्याचे आढळले.
अल्पसंख्याक आयोगाकडे केली तक्रार
अखेर हेरॉल्ड यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात २७ जून रोजी धाव घेऊन याप्रकरणी सावंत यांच्याविरुद्ध कलम ४४८ अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, सावंत या बिल्डरने यापूर्वीही आपल्याला ठार मारण्याची धमकी दिली असून याबाबत आपण अल्पसंख्याक आयोगाकडे तक्र ारही केली आहे, असे हेरॉल्ड कारवालो यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. पोलिसांनी मात्र हे सिव्हील मॅटर असल्याने या प्रकरणात न्यायालयात जाण्याचा सल्ला दिल्याने दाद तरी कुठे मागायची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, बिल्डर प्रभाकर सावंत यांच्याशी वारंवार संपर्क साधून ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाही.