Kolkata Rape Case Updates: कोलकाता येथील एका लॉ कॉलेजमध्ये सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वीच समोर आला. पोलिसांनी या प्रकरणी माजी विद्यार्थी आणि दोन सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अटक केली. ही घटना २५ जून रोजी सायंकाळी ७:३० ते १०:५० दरम्यान कॉलेज कॅम्पसमध्ये घडली. पीडित २४ वर्षीय विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिला तीन आरोपींनी घेरले. त्यापैकी दोघांनी तिला तिसऱ्या आरोपीच्या खोलीत डांबले. यानंतर तिसऱ्या आरोपीने तिला शौचालयात ओढत नेत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात अनेक नवनवीन माहिती समोर येत आहे. तशातच मुख्य आरोपी ३१ वर्षीय मोनोजित मिश्रा याच्या वकिलांनी एक धक्कादायक सवाल केला आहे.
शरीरावर लव्ह बाईट्स कसे आले?
मुख्य आरोपी मोनोजित मिश्रा याचे वकिलपत्र घेतलेल्या वकिलांनी असा सवाल केला आहे की, बलात्काराच्या वेळी आरोपीच्या शरीरावर उठलेल्या ओरखड्यांव्यतिरिक्त 'लव्ह बाईट्स' देखील सापडले आहेत. याबद्दल सरकारी वकिलांनी काहीही भाष्य केलेले नाही. तो जर बलात्कार होता, तर आरोपीच्या शरीरावर लव्ह बाईट्स कसे काय आले? असा धक्कादायक सवाल आरोपीच्या वकिलांनी केला आहे.
सरकारी वकिलांनी मेडिको-लीगल तपासणीनंतर युक्तिवादात असे सांगितले की, आरोपीच्या शरीरावर ओरखडे सापडले आहेत, ज्याचा अर्थ पीडितेने आरोपीला रोखायचा प्रयत्न केला होता. या युक्तिवादाला उत्तर देताना आरोपीच्या वकिलांनी धक्कादायक दावा केला. "सरकारी वकिलांनी सांगितले की मुख्य आरोपीच्या शरीरावर ओरखडे उठल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. पण आरोपीच्या शरीरावर लव्ह बाईट्सही सापडल्याचे त्यांनी सांगितले का? जर हा बलात्कार असेल तर आरोपीच्या शरीरावर लव्ह बाईट्स नसायला हवेत," असा युक्तिवाद मोनोजितचे वकिल राजु गांगुली यांनी केला.
आरोपी मोनोजितला ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
प्रकरणातील मुख्य आरोपी ३१ वर्षीय मोनोजित मिश्रा हा तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा (TMCP) नेता आहे. याशिवाय, जैब अहमद (१९) आणि प्रमित मुखर्जी (२०) हे अन्य आरोपी आहेत. मोनोजितने इतर दोघांच्या मदतीने २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्याला ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ही घटना कॉलेजमधील गार्ड रूममध्ये घडल्याने पोलिसांनी गार्डलाही अटक केली आहे. पोलीस तपासामध्ये मोनोजित मिश्रावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
एका अहवालानुसार, मुख्य आरोपी मोनोजित मिश्रावर लैंगिक अत्याचार, मारहाण, तोडफोड आणि चोरीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. कोलकातामध्ये मोनोजित हा 'हिस्ट्रीशीटर' म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर कालीघाट, कसबा, अलीपूर, हरिदेवपूर आणि टॉलीगंज पोलीस ठाण्यांमध्ये एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. काही वर्षांपूर्वी कॉलेज परिसरात एका महिलेचे कपडे फाडल्याचा आरोपही मोनोजितवर होता.