पती-पत्नीच्या भांडणातून उलगडलं किट्टूच्या हत्येचं रहस्य; २ वर्षांनी 'ते' सत्य ऐकून हादरले पालक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 14:11 IST2025-03-12T14:10:25+5:302025-03-12T14:11:11+5:30
सुमित आणि त्याची पत्नी रश्मी यांच्यात भांडण झालं. तेव्हा रश्मी रागाने तिची जुनी घर मालकीण पुष्पा यांच्याकडे गेली आणि दोन वर्षांपूर्वी झालेल्या गुन्ह्याचं रहस्य उघड केलं.

फोटो - आजतक
मेरठमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमित आणि त्याची पत्नी रश्मी यांच्यात भांडण झालं. तेव्हा रश्मी रागाने तिची जुनी घर मालकीण पुष्पा यांच्याकडे गेली आणि दोन वर्षांपूर्वी झालेल्या गुन्ह्याचं रहस्य उघड केलं. हे ऐकून पुष्पा आणि त्यांचा नवरा धीरेंद्र हादरले आणि ढसाढसा रडायला लागले. दोन वर्षांपूर्वी पुष्पा यांची पाच वर्षांची मुलगी किट्टू हिचं अपहरण झालं होतं आणि तेव्हापासून सर्वजण मुलीचा शोध घेत होता. आता रश्मीने पुष्पा यांना सांगितलं की, सुमितने किट्टूला मारून शेतात पुरलं आहे.
टीपी नगर पोलीस स्टेशन परिसरातील मुल्तान नगरची ही घटना आहे. धीरेंद्र सिंह यांची पत्नी पुष्पा एका रुग्णालयात काम करते. जानेवारी २०२३ च्या रात्री पुष्पा ड्युटीवर गेल्या होत्या. धीरेंद्र आणि त्यांची ५ वर्षांची मुलगी मानवी उर्फ किट्टू घरी होती. रात्री ११:०० वाजता किट्टूने घराचे गेट उघडलं आणि बाहेर येऊन सुमारे ३० सेकंद तिथेच उभा राहिली. त्यानंतर एक तरुण आला आणि किट्टूला घेऊन गेला. पोलिसांनी खूप शोध घेतला पण किट्टू सापडलीच नाही.
दोन वर्षांनंतर आता एक अनपेक्षित ट्विस्ट आला. पुष्पा यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत असलेली रश्मी आली. तिने पुष्पा यांना सांगितलं की, सुमितने तुमच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह शेतात पुरला आहे. रश्मीच्या या शब्दांनी पुष्पा यांच्या पायाखालची जमीन सरकली. पुष्पा ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या आणि संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी ताबडतोब सुमितला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी केली. सुमितने सत्य उघड केलं. त्याने सांगितलं की, दोन वर्षांपूर्वी पुष्पा यांनी त्याच्या वहिनीला काहीतरी खायला दिलं होतं, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला. चिडलेल्या सुमितने यानंतर मानवीचे अपहरण केलं आणि तिची हत्या केली.
मेरठच्या एसपी सिटी आयुषी विक्रम यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ वर्षांपूर्वी किट्टू नावाची एक मुलगी तिच्या घरातून बेपत्ता झाली होती. दोन दिवसांपूर्वी सुमित आरोपी असल्याचं समोर आलं आहे. जो धीरेंद्र आणि पुष्पा यांच्या घरी भाड्याने राहत होता. त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. चौकशीदरम्यान आरोपी सुमितच्या वहिनीला किट्टूच्या आईने काही अन्नपदार्थ दिले होते, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला. याचा सुमितला राग आला. याचाच बदला घेण्यासाठी त्याने किट्टूचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह जवळच्या शेतात लपवून ठेवला.