पती, पत्नी और वो; हत्येचा झाला उलगडा; बारा तासांत दोघा आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 05:37 IST2022-10-12T05:37:21+5:302022-10-12T05:37:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाडा : तालुक्यातील जाळे येथील विलास गोरे (वय ५०) यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी वैशाली गोरे (४३) ...

पती, पत्नी और वो; हत्येचा झाला उलगडा; बारा तासांत दोघा आरोपींना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : तालुक्यातील जाळे येथील विलास गोरे (वय ५०) यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी वैशाली गोरे (४३) व त्यांचा मित्र रामदास सोनावले (४४) यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गणेशपुरी पोलिसांनी बारा तासांत खुनाचा उलगडा केला. अनैतिक संबंधातून अडथळा येत असल्याने पत्नी आणि प्रियकराने त्यांचा खून केल्याचे उघड झाले आहे.
भिवंडी तालुक्यातील देवचोले गावाजवळ गोरे यांची रविवारी हत्या झाली होती. गोरे यांच्या पत्नी वैशाली हिच्यावर संशयाची सुई होती. पोलिसांनी वैशाली व रामदास यांना सोमवारी संध्याकाळी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी खुनाची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास आणि आरोपी रामदास सोनावले (रा. अस्नोली, ता. शहापूर) यांच्यात मैत्री असल्याने तो नेहमीच आरोपीच्या घरी येत होता. त्यातून आरोपीची पत्नी व त्याचे प्रेमसंबंध जुळले. या दोघांत तिच्या नवऱ्याची अडचण होत होती. ती कायमची दूर करण्यासाठी दोघांनी कट रचून खून केला असल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, गणेशपुरी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र आगरकर यांनी दिली.