रेल्वेत पत्नीच्या मृतदेहासोबत केला 500 Km प्रवास, कुणालाच साधी शंकाही आली नाही अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 13:43 IST2022-09-18T13:42:14+5:302022-09-18T13:43:33+5:30
पंजाबच्या लुधियानाहून बिहारला जाणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका पतीनं आपल्या पत्नीच्या मृतदेहासोबत ५०० किमीपर्यंतचा प्रवास केला.

रेल्वेत पत्नीच्या मृतदेहासोबत केला 500 Km प्रवास, कुणालाच साधी शंकाही आली नाही अन्...
शाहजहांपूर-
पंजाबच्या लुधियानाहून बिहारला जाणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका पतीनं आपल्या पत्नीच्या मृतदेहासोबत ५०० किमीपर्यंतचा प्रवास केला. विशेष म्हणजे, प्रवासात एकाही प्रवाशाला याची साधी शंका देखील आली नाही. काही काळानंतर एका सजग प्रवाशाला संशय आला आणि त्यानं याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर शाहजहांपूर रेल्वे आणि जीआरपी पोलिसांनी महिलाचा मृतदेह ताब्यात घेतला. आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
लुधियानाहून बिहारला जाणाऱ्या ट्रेनमध्ये पत्नीचा मृत्यू झाल्यानंतरही पती पत्नीच्या मृतदेहासोबत प्रवास करत होता. प्रवाशानं दिलेल्या सूचनेनंतर रेल्वे पोलिसांनी शाहजहांपूर येथे महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लुधियानाहून बिहारला जाणाऱ्या मोरध्वज एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडला आहे. नवीन कुमार नावाचा प्रवासी आपल्या पत्नीसोबत बिहारच्या औरंगाबाद येथे जात होता. प्रवासात त्याची पत्नी उर्मिला हिचा हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्यानंतर पतीनं या घटनेची कुणालाच कल्पना दिली नाही आणि पत्नीच्या मृतदेहासोबत ५०० किमीपर्यंतचा प्रवास केला.
ट्रेनमध्ये नवीन कुमार याच्यासोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशाला संशय आला आणि रेल्वे डब्यात मृतदेह असल्याची माहिती त्यानं रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर शाहजहांपूर येथे रेल्वे पोलीस आणि जीआरपीनं वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीनं मृतदेह रेल्वेतून खाली उतरवला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नीचा मृत्यू होऊन काही तास उलटले होते. सध्या पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहेत.