धक्कादायक! सासऱ्यानं पकडलं, सासूनं ब्लेड आणून दिलं अन् पतीनं पत्नीचं नाक छाटलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 15:58 IST2021-10-26T15:51:07+5:302021-10-26T15:58:25+5:30
मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. रागाच्या भरात एका पतीनं आपल्या पत्नीचं ब्लेडनं नाक छाटल्याचा प्रकार समोर आला आहे.

धक्कादायक! सासऱ्यानं पकडलं, सासूनं ब्लेड आणून दिलं अन् पतीनं पत्नीचं नाक छाटलं
मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. रागाच्या भरात एका पतीनं आपल्या पत्नीचं ब्लेडनं नाक छाटल्याचा प्रकार समोर आला आहे. बामोर कला पोलीस ठाण्यात पीडितेच्या जबाबावरुन याबाबतची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
राम प्रवेश वंशकार नावाच्या व्यक्तीनं स्वत:च्या पत्नीचं नाक छाटलं आहे. पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पत्नीचं नाक कापण्याआधी पतीनं त्याच्या मुलांनाही जबर मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
पती राम प्रवेश याच्या जाचाला कंटाळून त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. काही दिवसांनी ती सासरी परतली देखील. पण याचाच राग डोक्यात घेऊन पती राम प्रवेश मद्यपान घरी आला आणि पत्नीशी वाद घालू लागला. पीडित महिलेला दोन लहान मुली देखील आहेत. त्यांनाही मारहाण करु लागला. पत्नीनं पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या सासऱ्यांनी तिला पकडून ठेवलं होतं आणि पतीनं ब्लेडनं तिचं नाक छाटलं. सासूनं मुलाच्या हातात ब्लेड आणून देण्याचं काम केलं. त्यानंतर पती फरार झाला.
शिवपुरीचे एसपी राजेश सिंह चंदेल यांनी याप्रकरणी बामोर कला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन घेण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. पोलिसांकडून फरार पतीचा शोध घेतला जात आहे. तर महिलेवर खनियाधानाच्या आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.