पत्नीचा खून करून पतीचीही आत्महत्या, ठाण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 06:36 IST2021-02-19T04:13:21+5:302021-02-19T06:36:17+5:30
shocking incident in Thane : वागळे इस्टेट येथील एका पेस्ट कंट्रोल करणाऱ्या खासगी कंपनीमध्ये नोकरी करणारा आकाश आणि अश्विनी यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. घरात तिच्या सासू, सासऱ्यांबरोबर होणाऱ्या भांडणांमुळे तिने वेगळे घर घेण्याची मागणी आकाशकडे केली होती.

पत्नीचा खून करून पतीचीही आत्महत्या, ठाण्यातील धक्कादायक घटना
ठाणे : सासू-सासऱ्यांपासून वेगळे राहण्याची मागणी करणारी पत्नी अश्विनी (वय १८) हिचा निर्घृण खून करून आकाश समुखराव (२९, रा. वागळे इस्टेट, ठाणे) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. १७) पहाटेच्या सुमारास घडली.
वागळे इस्टेट येथील एका पेस्ट कंट्रोल करणाऱ्या खासगी कंपनीमध्ये नोकरी करणारा आकाश आणि अश्विनी यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. घरात तिच्या सासू, सासऱ्यांबरोबर होणाऱ्या भांडणांमुळे तिने वेगळे घर घेण्याची मागणी आकाशकडे केली होती. यातूनच या दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती. सध्या ते इंदिरानगर येथील घरात एकत्र कुटुंब पद्धतीने वास्तव्य करीत होते. मात्र, रात्री झोपण्यासाठी ते जवळच असलेल्या रूपादेवी पाडा क्रमांक दोन येथील रणजित शिरसाठ या नातेवाइकाच्या घरी जात होते. १६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता ते या घरी झोपण्यासाठी गेले. मात्र तिथे पुन्हा त्यांचा याच मुद्द्यावरून वाद झाला. दुसऱ्या दिवशी बुधवारी रोजी सकाळी १० वाजले तरी या घरातून काहीच आवाज आला नाही. त्यावेळी त्यांच्या नातेवाइकांनी आणि शेजारच्यांनी या घराच्या मागील बाजूने आत डोकावले. त्यावेळी आकाश एका साडीला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळला. त्यावेळी या घराच्या छताचा पत्रा उचकटून स्थानिकांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी त्याची पत्नी अश्विनी हीदेखील रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. जवळच लोखंडी हातोडाही होता. तिच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार केल्याचे आढळले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त विनय राठोड, सहायक पोलीस आयुक्त जयंत बजबळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली.
तपास सुरू
श्रीनगर पोलिसांनी आकाशविरुद्ध पत्नीचा खून आणि स्वत: आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचे सहायक पोलीस आयुक्त बजबळे यांनी सांगितले.