मृतदेह बॅगेत भरून पळालेल्या पतीस अटक; आत्महत्येचा प्रयत्न करणारा पती रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 15:58 IST2025-03-29T15:57:41+5:302025-03-29T15:58:32+5:30
पत्नीच्या खुनानंतर मानसिक तणावाखाली आलेल्या पतीने विषारी औषध प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला

मृतदेह बॅगेत भरून पळालेल्या पतीस अटक; आत्महत्येचा प्रयत्न करणारा पती रुग्णालयात दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, शिरवळ (जि. सातारा) : बंगळुरू येथून परत मुंबईला राहण्यासाठी जाऊ या, असे पत्नी वारंवार म्हणत भांडणे करत होती. यातून होणाऱ्या वादातून पत्नीचा चाकूने खून करून मृतदेह बॅगेत भरून कारने मुंबईच्या दिशेने निघालेल्या पतीला शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले.
पत्नीच्या खुनानंतर मानसिक तणावाखाली आलेल्या पतीने विषारी औषध प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. शिरवळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेत बंगळुरू पोलिसांच्या स्वाधीन केले. विष प्राशन केल्याने शिरवळ येथील खासगी रुग्णालयातून पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले. गौरी राकेश खेडेकर (३२) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर राकेश राजेंद्र खेडेकर (३५, दोघे सध्या रा. बनारगट्टा, तेजस्विनीनगर, बंगळुरु, मूळ रा. जोगेश्वरी, मुंबई), असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. राकेश मुंबई येथून बंगळुरुला पत्नीसह कामानिमित्त स्थायिक झाला. २६ मार्चच्या मध्यरात्री राकेशकडे गौरी हिने मुंबईला जाण्याचा आग्रह धरला. यावरून वादंग झाला.
वाटेत प्राशन केले झुरळ मारण्याचे औषध
खूनानंतर राकेशने घरातील मोठ्या बॅगेत गौरीचा मृतदेह भरून २७ मार्चच्या मध्यरात्री बाराच्या दरम्यान घरातील साहित्य सोबत घेऊन कारमधून जोगेश्वरी, मुंबई येथे जाण्यासाठी निघाला. वाटेत फिनाईल व झुरळ मारण्याचे औषध घेतले. बंगळुरु येथील एकाला खुनाबाबत माहिती दिली. संबंधित व्यक्तीने पोलिसांना कळविले. राकेशने खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी हद्दीत विषारी औषध प्राशन केले. अत्यवस्थ वाटल्याने एका दुचाकीचालकाने त्याला शिरवळ येथील खासगी रुग्णालयात आणले. त्या ठिकाणी शिरवळ पोलिसांना राकेशने खुनाची माहिती दिली.