त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 10:09 IST2025-10-16T09:38:02+5:302025-10-16T10:09:36+5:30
सध्या पोलिसांनी कृतिका रेड्डी हत्या प्रकरणी आरोपी महेंद्र रेड्डीविरोधात भारतीय न्याय दंड संहिता २०२३ च्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
बंगळुरू - कर्नाटकची राजधानी बंगळुरू इथं डॉक्टर कृतिका एम रेड्डी हिच्या गूढ मृत्यूचं रहस्य उलगडलं आहे. या प्रकरणात तिचा पती आणि व्यवसायाने सर्जन असलेल्या डॉ. महेंद्र रेड्डी याला अटक करण्यात आली आहे. महेंद्रने त्याच्या पत्नीला प्रोप्रोफोल नावाचं शक्तिशाली एनेस्थेटिक औषध देऊन मारून टाकले.
२९ वर्षीय डॉक्टर कृतिका एम रेड्डी हिचं लग्न मागील वर्षी महेंद्र रेड्डी याच्यासोबत झाले होते. २४ एप्रिल २०२५ रोजी तिचा मृतदेह राहत्या घरी संशयास्पद स्थितीत आढळला. सुरुवातीच्या तपासात तिने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, परंतु पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये तिच्या शरीरात प्रोप्रोफोलचं प्रमाण आढळल्याने पोलिसांना तिच्या हत्येचा संशय आला. कृतिकाच्या लग्नाला एक वर्षही झाले नव्हते. बंगळुरू पोलीस अधीक्षक सीमांत कुमार सिंह यांनी सांगितले की, आरोपीने हत्येसाठी वापरलेले औषध बेकायदेशीरपणे त्याच्या हॉस्पिटलमध्ये ठेवले होते. पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा आरोपी डॉ. महेंद्रचा गुन्हेगारी इतिहास समोर आला. त्याच्याविरोधात फसवणूक आणि धमकावणे यासारखे गुन्हे दाखल होते. कृतिकाच्या हत्येचा गुन्हाही आरोपीवर दाखल झाला आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच आरोपी महेंद्र रेड्डीचा जुळा भाऊ डॉक्टर नागेंद्र रेड्डी याच्यावरही अशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सध्या पोलिसांनी कृतिका रेड्डी हत्या प्रकरणी आरोपी महेंद्र रेड्डीविरोधात भारतीय न्याय दंड संहिता २०२३ च्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याखाली दोषी आढळल्यास महेंद्र रेड्डीला आजीवन कारावास किंवा फाशी शिक्षा होऊ शकते. बंगळुरू पोलिसांनी आरोपीला रिमांडवर घेतल्यानंतर चौकशी सुरू केली. मृत कृतिकाच्या कुटुंबाने आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि आमच्या मुलीला न्याय द्या अशी मागणी केली आहे.
नेमकं काय घडलं?
महेंद्र आणि कृतिका यांचं लग्न २६ मे २०२४ रोजी झाले होते. लग्नानंतर अवघ्या ११ महिन्यात कृतिकाचा संशयास्पद मृत्यू झाला. महेंद्रने कृतिकाची हत्या प्लॅनिंग करून केली. महेंद्रला कृतिकाच्या आरोग्याबाबत आधीच माहिती होती. त्याने त्याचाच फायदा घेतला. २१ एप्रिलला महेंद्रने घरी पत्नीच्या पोटात दुखतंय म्हणून IV इंजेक्शन दिले. त्यानंतर तिला आरामाची गरज असल्याने माहेरी पाठवले. २३ एप्रिलच्या रात्री महेंद्र सासरी पोहचला आणि पुन्हा आणखी एक इंजेक्शन पत्नीला दिले. दुसऱ्या दिवशी २४ एप्रिलला कृतिका बेशुद्ध अवस्थेत आढळली. डॉक्टर असतानाही पतीने तिला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला नाही. तिला दवाखान्यात नेण्यात आले जिथे डॉक्टरांनी तपासून कृतिकाला मृत घोषित केले.