"मी माझ्या मुलीला कसं मारू?..."; मुलीनं पळून जाऊन केले लग्न; बापाने स्वत:ला गोळी झाडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 15:33 IST2025-04-13T15:33:08+5:302025-04-13T15:33:29+5:30
मुलीच्या वडिलांनी या घटनेचा ताण घेत आत्महत्या केली. त्यांच्या खोलीत सुसाईड नोट आढळली

"मी माझ्या मुलीला कसं मारू?..."; मुलीनं पळून जाऊन केले लग्न; बापाने स्वत:ला गोळी झाडली
मध्य प्रदेशच्या ग्वालियर इथं ४९ वर्षीय मेडिकल स्टोअरच्या मालकानं आत्महत्या केली आहे. मुलीनं आपल्या मर्जी विरोधात लग्न केले त्यामुळे ते तणावात होते. एकेदिवशी ते खोलीत गेले आणि त्यांच्या खोलीतून गोळीचा आवाज ऐकायला आला. कुटुंबातील सदस्य जेव्हा त्यांच्या खोलीच्या दिशेने धावले तेव्हा तिथे ते मृतावस्थेत पडले होते.
रिपोर्टनुसार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृष्ण लालचंदानी यांनी सांगितले की, मृत व्यक्तीच्या मुलीने १५ दिवसांपूर्वी त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या जातीतील युवकासोबत पळून जात लग्न केले होते. तिचा शोध घेतला गेला तेव्हा ती इंदूरमध्ये राहत असल्याचं कळलं. हे प्रकरण कोर्टात गेले, तिथे कायदेशीररित्या दोघेही सज्ञान असल्याने त्यांच्या विवाहाला मान्यता मिळाली. कोर्टाच्या निर्णयानंतर मुलीने तिच्या पतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
मुलीच्या वडिलांनी या घटनेचा ताण घेत आत्महत्या केली. त्यांच्या खोलीत सुसाईड नोट आढळली. ही नोट मुलीच्या आधार कार्ड प्रिंटआऊटवर लिहिली होती. मुलीने घरच्यांच्या विरोधात जात तिच्या मर्जीने लग्न केले त्यामुळे कुटुंबाला धक्का बसल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. त्यात वडिलांनी म्हटलंय की, तू चुकीचे केले. मी जात आहे. मी तुम्हा दोघांना मारू शकत होतो परंतु मी माझ्या मुलीला कसं मारणार? मुली, तू जे केले ते योग्य नाही आणि जो वकील काही पैशांसाठी कुटुंबाविरोधात जातो. त्याला मुलगी नाही का, तो एका बापाचे दु:ख समजू शकत नाही का..आता समाजात काही राहिले नाही असं त्यांनी म्हटलं.
या सुसाईड नोटमध्ये जर आर्य समाजाला हे लग्न मान्य नाही तर कोर्टाने मुलीला मुलासोबत जाण्याची परवानगी कशी दिली असा सवालही बापाने सुसाईड नोटमध्ये उपस्थित केला. त्यातच मेडिकल स्टोअर मालकाच्या नातेवाईकांनी मुलीनं ज्या मुलाशी लग्न केले त्याच्या वडिलांवर हल्ला केल्याचं समोर आले. मुलाच्या वडिलाला तोपर्यंत मारले जोवर तो बेशुद्ध पडत नाही. आसपासच्या लोकांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला आणि जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. आत्महत्या आणि मुलाच्या वडिलांना मारहाण या दोन्ही घटनांचा तपास पोलीस करत आहेत.