भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 08:46 IST2025-10-27T08:46:20+5:302025-10-27T08:46:34+5:30
मध्य प्रदेशमधील गुना जिल्ह्यातून भाजप नेत्याच्या गुंडगिरीचा एक अत्यंत क्रूर आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.

भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
मध्य प्रदेशमधील गुना जिल्ह्यातून भाजप नेत्याच्या गुंडगिरीचा एक अत्यंत क्रूर आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. गणेशपुरा गावात भाजप पदाधिकारी महेंद्र नागर याने जमीन वादातून एका शेतकऱ्याची थार गाडीखाली चिरडून निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या शेतकऱ्याच्या मुलींसोबतही आरोपी नागर याने अमानुष वर्तन केले आणि त्यांचे कपडे फाडले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी मुख्य आरोपीसह १४ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
फतेहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणेशपुरा गावात ही हादरवणारी घटना घडली. शेतकरी रामस्वरूप धाकड आपल्या पत्नीसह शेतात जात असताना, भाजप नेता महेंद्र नागर आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना अडवले. जमिनीच्या जुन्या वादातून नागरने आधी रामस्वरूप धाकड यांना बेदम मारहाण केली. मारहाणीत शेतकरी गंभीर जखमी झाल्यानंतर नागर याने क्रौर्याची सीमा ओलांडली आणि त्यांच्या अंगावर आपली महिंद्रा 'थार' गाडी चढवली.
या भयानक कृत्यानंतर रामस्वरूप यांच्या मुली जेव्हा मदतीसाठी धावल्या, तेव्हा आरोपी महेंद्र नागरने त्यांच्यावरही हल्ला केला. त्याने मुलींना मारहाण केली, त्यांचे कपडे फाडले आणि दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबारही केला. जखमी शेतकरी रामस्वरूप यांना तब्बल एक तास उपचारासाठी गावाबाहेर नेऊ दिले गेले नाही. अखेर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
छोट्या शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणारा 'आतंक'
पोलिसांच्या माहितीनुसार आणि पीडित कुटुंबाच्या आरोपांनुसार, आरोपी महेंद्र नागर हा परिसरात 'दहशत' माजवण्यासाठी ओळखला जातो. तो लहान शेतकऱ्यांना धमकावून त्यांच्या जमिनी बळकावतो. त्याच्या दहशतीमुळे जवळपास २५ शेतकऱ्यांनी जमिनी विकून गाव सोडल्याचे सांगितले जात आहे. रामस्वरूप धाकड यांनी नागरच्या या दादागिरीला विरोध केल्यामुळे त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे विरोधी पक्षांनी भाजप नेत्यांची गुंडगिरी वाढल्याचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी महेंद्र नागर आणि त्याच्या कुटुंबातील तीन महिलांसह एकूण १४ लोकांविरोधात खुनाचा (कलम ३०२) गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.