पती-पत्नीमधील वादाचे रूपांतर अनेकदा हाणामारीत झाल्याचे आपण ऐकले असेल, पण गाझियाबादमध्ये एका महिलेने क्रूरतेची सर्व सीमा ओलांडली आहे. घरगुती वादातून संतापलेल्या पत्नीने आपल्या पतीची जीभ चक्क दातांनी चावून तोडल्याची खळबळजनक घटना मोदीनगर भागात घडली आहे. गंभीर जखमी पतीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
नेमकं प्रकरण काय?
मोदीनगरमधील संजयपुरी गावात राहणाऱ्या विपिनचा विवाह वर्षभरापूर्वी मेरठ येथील ईशाशी झाला होता. रविवारी दुपारी जेवण बनवण्याच्या शुल्लक कारणावरून या दोघांमध्ये खटके उडाले. सुरुवातीला हा वाद शांत झाला, पण रात्री उशिरा पुन्हा वादाची ठिणगी पडली.
रागाच्या भरात घेतला जीभेचा लचका
दोघांमधील शाब्दिक वाद इतका वाढला की ईशाचा स्वतःवरील ताबा सुटला. रागाच्या भरात तिने पती विपिनच्या जीभेवर दातांनी जोरात प्रहार केला. यामध्ये विपिनच्या जीभेचा एक भाग कापला गेला आणि प्रचंड रक्तस्राव सुरू झाला. वेदनेने विव्हळणाऱ्या विपिनला त्याच्या कुटुंबीयांनी तत्काळ जवळच्या रुग्णालयात हलवले. डॉक्टरांच्या मते, त्याची जखम खोल असून त्याला बोलण्यातही अडचण निर्माण होऊ शकते.
माहेरचे लोक आले अन् राडा झाला!
या घटनेनंतर प्रकरणाला आणखी एक वळण मिळाले. विपिनच्या जीभेला जखम झाल्याचे कळताच ईशाच्या माहेरचे लोक संजयपुरी गावात पोहोचले. आपल्या मुलीची बाजू घेत त्यांनी सासरच्या मंडळींशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे रूपांतर नंतर तुंबळ हाणामारीत झाले. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तक्रारीविना पोलीसही चक्रावले
एवढी मोठी घटना घडूनही अद्याप कोणत्याही पक्षाने पोलिसांत लेखी तक्रार दिलेली नाही. एसीपी मोदीनगर यांनी सांगितले की, सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांतून त्यांना या घटनेची माहिती मिळाली आहे. पोलीस स्वतःहून या प्रकरणाचा तपास करत आहेत. "विपिनवर सध्या उपचार सुरू आहेत, जशी तक्रार प्राप्त होईल तशी कायदेशीर कारवाई केली जाईल," असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Web Summary : In Modinagar, a wife bit off her husband's tongue during a dispute over food. The severely injured man is hospitalized. Family conflict escalated, leading to violence and a police investigation, despite no formal complaint being filed.
Web Summary : मोदीनगर में खाने के विवाद में एक पत्नी ने अपने पति की जीभ काट ली। गंभीर रूप से घायल व्यक्ति अस्पताल में भर्ती है। पारिवारिक झगड़ा बढ़ने से हिंसा हुई और पुलिस जांच कर रही है, हालांकि कोई औपचारिक शिकायत दर्ज नहीं की गई है।