बांगलादेशातील ३ नद्यांमध्ये सातत्याने मृतदेह सापडत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. बुरिगंगा, शीतलाक्ष्य आणि मेघना नदीतून आतापर्यंत ७५० मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचं बांगलादेशातील पोलिसांनी सांगितले. त्यातील बहुतांश मृतदेह कुणाचे आहेत ते पोलिसांना माहिती नाही. नदीमधून सतत मृतदेह सापडण्याच्या घटनेमुळे प्रशासनात खळबळ माजली आहे. सरकार आणि प्रशासनाकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. यातील अनेक मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
बांगलादेशातील मजमिन वृत्तपत्रात याबाबत सविस्तर रिपोर्ट आला आहे. माहितीनुसार, आतापर्यंत जे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत, त्यातील अनेक बॅगेत टाकून फेकलेले होते. काही मृतदेहांच्या गळ्यात विट आणि दगड बांधून फेकण्यात आले होते. काही मृतदेहांची ओळख पटली आहे तर काहींना विना ओळख दफन करण्यात आले आहे. हे सर्व मृतदेह बेपत्ता लोकांचे आहेत. हे कधी गायब झाले होते याची माहिती घेतली जात आहे. परंतु नदीमध्ये दरदिवशी २-३ मृतदेह सापडले जात आहेत. आवामी लीग सरकार असताना ही संख्या ५ हून अधिक होती.
कुणाचे मृतदेह, कुठून टाकले जातात..? २ थेअरीची चर्चा
नदीमध्ये सापडणाऱ्या मृतदेहांमागे २ थेअरीची चर्चा आहे. पहिली म्हणजे गुंडांकडून अपहरण झालेल्या लोकांना मारून त्यांचे मृतदेह नदीत फेकले जातात. जेणेकरून हे मृतदेह कुणाला सापडू नयेत. जेव्हा पाण्यामुळे मृतदेह फुगतात तेव्हा ते बाहेर येतात आणि पोलिसांना याची भनक लागते. बांगलादेशात प्रत्येक महिन्याला ८७ लोकांचे अपहरण होते, हे आकडे २०१४ च्या तुलनेत ६१ टक्के जास्त आहेत. बांगलादेशातील सरकार अपहरण आणि त्यानंतर होणाऱ्या हत्या रोखण्यास अपयशी ठरले आहे. सरकारच्या गृह सल्लागारानेही याची कबुली दिली.
दुसरी थेअरी म्हणजे, बहुतांश मृतदेह हे शेख हसीना यांच्या कार्यकाळात नदीत फेकले होते, मानवाधिकार संस्थेने हसीना सरकारमध्ये ७०० लोक गायब झाले होते. हे लोक कुठे गेले, कसे मारले गेले याची माहिती आताच्या युनूस सरकारलाही मिळाली नाही. या प्रकाराचे फारसे गांभीर्य पोलीस घेत नाहीत. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. २००८ ते २०२४ या काळात बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार होते.