माझ्या बहिणीवर प्रेम करायची तुझी हिंमत कशी झाली? तमिळनाडूत इंजिनिअर तरुणाची भररस्त्यात हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 18:49 IST2025-07-29T18:48:35+5:302025-07-29T18:49:46+5:30
तमिळनाडूमध्ये दुसऱ्या जातीच्या मुलीसोबत प्रेम केल्यामुळे एका इंजिनिअर तरुणाची हत्या करण्यात आली.

माझ्या बहिणीवर प्रेम करायची तुझी हिंमत कशी झाली? तमिळनाडूत इंजिनिअर तरुणाची भररस्त्यात हत्या
Tamil Nadu Crime: तमिळनाडूत ऑनर किलिंगची हादरवणारी घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या दलित सॉफ्टवेअर इंजिनिअरची उच्च जातीतील मुलीवर प्रेम केल्यामुळे हत्या करण्यात आली. मुलीच्या भावाने तरुणाला रस्त्यात गाठत त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले ज्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. तू खालच्या जातीचा असून माझ्या बहिणीवर प्रेम करायची तुझी हिंमतच कशी झाली? असं म्हणत मुलीच्या भावाने सॉफ्टवेअर इंजिनिअरवर हल्ला केला होता.
२७ जुलै रोजी तामिळनाडूमध्ये दलित तरुणाची त्याच्या प्रेयसीच्या भावाने दिवसाढवळ्या हत्या केली. मृतक २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर कविन सेल्वा गणेशची भररस्त्यात हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर, आरोपी स्वतः पोलिसांसमोर शरण गेला. पोलिस आणि कविनच्या कुटुंबीयांनी हे ऑनर किलिंगचे प्रकरण असल्याचे म्हटलं. कवनिच्या प्रेयसीच्या कुटुंबाला त्यांचे नाते मान्य नव्हते अशी माहिती समोर आली. त्यामुळेच कवीनच्या प्रेयसीच्या भावानेच कोयत्याचे वार करुन त्याची हत्या केली.
कविन सेल्वा गणेश हा तुतीकोरिन जिल्ह्यातील अरुमुगमंगलम गावचा रहिवासी होता आणि चेन्नईतील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. तो शालेय जीवनापासूनच एका मुलीच्या प्रेमात होता. कविन आणि त्याच्या प्रेयसीची जात वेगवेगळी होती. कविनची हत्या करणारा
आरोपी २१ वर्षीय सुरजित हा त्याच्या प्रेयसीचा भाऊ आहे. मुलीचे कुटुंबिय पोलिसात आहे. मुलीच्या कुटुंबाला त्यांचे नाते मान्य नव्हते कारण ते एकाच जातीचे नव्हते. मुलीच्या पालकांनी कविनला अनेक वेळा धमकीही दिली होती.
कविनच्या आईच्या तक्रारीनुसार, रविवारी कविन त्याच्या आजोबांच्या तब्येतीबद्दल मुलीला माहिती देण्यासाठी गेला होता. सुरजीतही तिथे होता. त्याने कविनला माझ्या पालकांना तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगून सोबत नेले. कविनने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तो त्याच्यासोबत गेला. पण सुरजीतने अचानक बाईक मध्येच थांबवली. मग तो मोठ्याने ओरडू लागला की दुसऱ्या जातीच्या मुलीवर प्रेम करण्याची तुझी हिंमत कशी होऊ शकते? यानंतर, सुरजीतने कोयता काढून कविनवर हल्ला केला. कविनने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण सुरजीतने त्याचा पाठलाग केला आणि रुग्णालयापासून सुमारे २०० मीटर अंतरावर त्याला ठार मारले. सुरुवातीला तो घटनास्थळावरून पळून गेला मात्र नंतर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
दरम्यान, पोलिसांनी सुरजीतला अटक केली आहे. त्याच्यावर आणि त्याच्या पालकांवर बीएनएस तसेच एससी/एसटी कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.