रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; विसरून गेलेल्या प्रवाशाचे दीड लाख दिले परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 20:50 IST2020-03-06T20:46:37+5:302020-03-06T20:50:55+5:30
पोलिसांनी बॅग मालकाचा शोध घेऊन बॅग व बॅगेतील रक्कम मूळ मालक सुरेश सांगळे यांच्या ताब्यात दिली.

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; विसरून गेलेल्या प्रवाशाचे दीड लाख दिले परत
पनवेल - रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे रिक्षात हरवलेली 1 लाख 52 हजार रुपयांची रोख रक्कम प्रवाशाला परत मिळाली. खारघरमध्ये हा प्रकार घडला असून सुरजकुमार अजय झा (वय 22) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे.
मूळचे नांदेडचे असलेले सुरेश पांडुरंग सांगळे हे प्रवासी शुक्रवारी तळोजा येथून खारघरकडे रिक्षाने प्रवास करत असताना त्यांची बॅग सुरजकुमार याच्या रिक्षामध्ये (रिक्षा क्रमांक MH.46 AC-3799) विसरले. परंतु रिक्षाचालकाने खारघर पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्याकडे ती बॅग जमा केली. या बॅगेत 1 लाख 52 हजार एवढी रोख रक्कम असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी बॅग मालकाचा शोध घेऊन बॅग व बॅगेतील रक्कम मूळ मालक सुरेश सांगळे यांच्या ताब्यात दिली. रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा पाहून खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार, पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी रिक्षाचालक सुरजकुमार झा याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे.