काँग्रेस कार्यकर्ती हिमानी नरवालच्या हत्येप्रकरणी हरियाणा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. शनिवारी रोहतकमध्ये तिचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळल्यानंतर दुसऱ्या दिवशी हरियाणा पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन केलं. हरियाणा पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही एका आरोपीला अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे." हिमानीच्या कुटुंबाने रविवारी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता आणि म्हटलं होतं की, जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत ते अंत्यसंस्कार करणार नाहीत.
हिमानीच्या आईने काय सांगितलं?
एनडीटीव्हीशी बोलताना हिमानीच्या आईने सांगितलं की, "आरोपीला पकडल्याची आम्हाला कोणतीही माहिती नाही. आम्ही बातमीत पाहिलं की एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. जो व्यक्ती स्वतःला माझ्या मुलीचा बॉयफ्रेंड किंवा मित्र म्हणवत आहे, जर तो आमच्या घरी येत जात होता तर तो हत्या कशी करू शकतो? कधीतरी त्याने आम्हाला किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला स्वतःबद्दल आणि हिमानीबद्दल सांगितलं असतं. माझी मुलगी अनेक लोकांच्या संपर्कात होती, तिला लोक पैशांची ऑफर द्यायचे पण ती कधीच पैसे घ्यायची नाही. तिने कधी फी भरण्यासाठीही पैसे मागितले नाहीत."
"माझ्या मुलीसाठी पैसे महत्त्वाचे नव्हते"
"आमच्या घरी एक व्यक्ती येत नव्हती, तर खूप लोक यायचे. पक्षातील लोक आणि मित्रमैत्रिणी असे बरेच लोक घरी येत असत. युनिव्हर्सिटीतील मुलीही येत असत, शाळेतील मैत्रिणीही येत असत. मित्र आणि बॉयफ्रेंड यात खूप फरक असतो. माझ्या मुलीचा बॉयफ्रेंड नाही. संपूर्ण रोहतकला माहीत आहे की, ती कोणाचाही एक शब्दही ऐकून घेत नव्हती. माझ्या मुलीसाठी पैसे महत्त्वाचे नव्हते."
"मला हे षड्यंत्र वाटतंय"
"मी तुम्हाला हे देखील सांगत आहे की, ही सुटकेस आमच्याच घरातील आहे. अशी एक व्यक्ती असू शकते ज्यावर ती सर्वात जास्त विश्वास ठेवत होती. आमच्या घरी दुसरं कोणीही येत नव्हतं. २७ तारखेला मी चार वाजेपर्यंत माझ्या मुलीसोबत होते. २८ तारखेच्या दुपारपर्यंत तिने पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.पोलिसांनी कॉल डिटेल्स तपासावे. मला याबद्दल काहीही माहिती नाही.आपण आपापसात आणि पक्ष कार्यकर्त्यांशी बोलू आणि नंतर तुम्हाला सांगू. मी एकटी मृतदेहासंबंधित निर्णय घेऊ शकत नाही. माझ्या कुटुंबाशी बोलल्यानंतरच मी सांगेन. मला वाटतं की हे एक षड्यंत्र आहे कारण माझी मुलगी पैसे मागत होती हे खोटं आहे."