'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 11:57 IST2025-08-20T11:57:08+5:302025-08-20T11:57:35+5:30
गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या या विद्यार्थिनीवर तिच्या कुटुंबियांनी एका तांत्रिकाच्या मदतीने भूत उतरवण्याचा उपचार सुरू केला.

'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात एका १४ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीचा अंधश्रद्धेमुळे दुर्दैवी अंत झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या या विद्यार्थिनीवर तिच्या कुटुंबियांनी एका तांत्रिकाच्या मदतीने भूत उतरवण्याचा उपचार सुरू केला. या क्रियेदरम्यान तिला अमानुष मारहाण करण्यात आली आणि गरम सळीने चटके दिले गेले. ही मारहाण सहन न झाल्याने तिचा मृत्यू झाला.
नेमका काय घडला प्रकार?
ही घटना खल्लासीपुरा भागात घडली आहे. येथील सुनील पाल यांची मुलगी रौनक गेल्या १५ दिवसांपासून आजारी होती. डॉक्टरी उपचार करूनही तिला फरक पडत नसल्याने कुटुंबियांनी एका नातेवाईकाच्या सल्ल्याने तांत्रिकाला बोलावले. तांत्रिकाने रौनकवर भूत-प्रेताची सावली असल्याचं सांगितलं आणि ते काढण्यासाठी धार्मिक विधी सुरू केले.
या विधीदरम्यान, तांत्रिकाने रौनकवर निर्दयीपणे काठीने मारहाण केली आणि तिच्या शरीरावर गरम सळीने चटके दिले. ती वेदनेने विव्हळत असतानाही, तांत्रिक आणि तिचे आई-वडील थांबले नाहीत. या सततच्या छळामुळे तिचा मृत्यू झाला.
पोलीस घटनास्थळी दाखल
रौनकचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबिय तिचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी घेऊन जात होते, त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस सध्या शवविच्छेदनाच्या अहवालाची वाट पाहत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तांत्रिकाचा शोध सुरू आहे.
वडिलांनी नाकारला तांत्रिक क्रियेचा आरोप
रौनकचे वडील सुनील पाल यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत तांत्रिक क्रियेबद्दल काहीही सांगितलं नाही. "माझी मुलगी गेल्या १५ दिवसांपासून आजारी होती आणि डॉक्टरांनी उपचार करूनही तिला आराम मिळाला नाही. तिने घरीच अखेरचा श्वास घेतला," असं त्यांनी पोलिसांना सांगितलं.
मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची माहिती त्यांना मिळाली होती. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.