अपहृत मुलाची सुखरूप सुटका; पाच लाखाची खंडणी मागणारे दोघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 16:37 IST2018-11-08T16:35:18+5:302018-11-08T16:37:41+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शकील सलीम खान (वय 32, रा. मुबई), शारुख मिरज खान (वय 26, वाल्हेकर वाडी) अशी आरोपींची नावे आहेत.

Hijacked kidnapped child; Both of them demanded the ransom of five lakhs | अपहृत मुलाची सुखरूप सुटका; पाच लाखाची खंडणी मागणारे दोघे अटकेत

अपहृत मुलाची सुखरूप सुटका; पाच लाखाची खंडणी मागणारे दोघे अटकेत

पिंपरी - थेरगाव येथे राहणाऱ्या एका भंगार व्यवसायिकाच्या पाच वर्षांच्या मुलाची अपहरण करण्यात आली होतं. या चिमुकल्याची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका करण्यात आली. सुफियान नासिर खान असे अपहृत बालकाचे नाव आहे. याप्रकरणी दोघा अपहरणकर्त्याना बुधवारी  वाकड पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शकील सलीम खान (वय 32, रा. मुबई), शारुख मिरज खान (वय 26, वाल्हेकर वाडी) अशी आरोपींची नावे आहेत. 4 ऑक्टोबरला दुचाकीवरून आलेल्या एकाने सुफियानला नेले. सुफियान बेपत्ता झाल्याची फिर्याद नासिर झाकीर खान यांनी पोलिसांकडे दिली. दुसऱ्या दिवशी अपहरणकर्त्याने तुमहारा लडका हमारे कबजे मे है, अगर वो सही सलामत चाईए तो पाच लाख रुपये दो असे फोनवरून धमकावले.  त्यावेळी खंडणीसाठी अपहरण  झाले असल्याचे निष्पन्न झाले. 

पोलिसांनी तपास पथके तयार केली. एकाने मुलाला नेले तर दुसरा येथून त्याला मदत करीत होता. आरोपी मोहम्मद याने मुलाला शिक्रापूर, लोणावळा आणि वसई, विरार येथे नेले होते. पोलिसांनी दुसरा आरोपी शाहरुखला ताब्यात घेतले होते. त्याला बरोबर घेऊन पोलीस पथक दुसऱ्या आरोपीच्या मागावर होते. खंडणीची रक्कम देण्याची तयारी दाखवून आरोपीला बोलावण्यात आले. 7 ऑक्टोबरला आरोपी मुलाला घेऊन चिंचवड येथे खंडणीची रक्कम नेण्यासाठी आला. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि  त्याच्याकडून मुलाची सुखरूप सुटका केली. 

दोन्ही आरोपी हे साडू

खंडणीसाठी अपहरण करणारे दोन्ही आरोपी नात्याने साडू आहेत. त्यातील आरोपी  शाहरुख खान याचे अपहृत मुलाच्या आईच्या ब्युटी पार्लरशेजारी अंडी विक्रीचे दुकान आहे. त्यामुळे आरोपी अपहृत मुलाच्या आई वडीलांच्या ओळखीचे आहेत. त्यांची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे माहित असल्याने त्यानी मुलाच्या अपहरणाचा कट रचला होता, तो अपयशी ठरला. पोलिसानी त्यांना जेरबंद केले.पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलिस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलिश निरीक्षक सतीश माने, पोलीस अधिकारी  हरीश माने तसेच दत्तात्रय सणस, बिभीषण कण्हेरकर, रमेश गायकवाड, प्रमोद भांडवलकर, मधुकर चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली. अपहृत मुलगा सुखरूप आल्याने पालकांनी पोलिसांचे आभार मानले.

Web Title: Hijacked kidnapped child; Both of them demanded the ransom of five lakhs