शिवोलीत फ्लॅटमध्ये रशियन जोडप्याकडून गांजा लागवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 20:11 IST2018-12-08T20:11:34+5:302018-12-08T20:11:55+5:30
हणजूण पोलिसांनी शिवोली येथे धाड टाकून गांजा या अमली पदार्थाची शेती करणाºया दोघा रशियन जोडप्याला अटक केली. सुमारे १५ लाखांचा अमली पदार्थासह शेती लागवडीसाठी लागणारे सामान जप्त केले.

शिवोलीत फ्लॅटमध्ये रशियन जोडप्याकडून गांजा लागवड
म्हापसा: हणजूण पोलिसांनी शिवोली येथे धाड टाकून गांजा या अमली पदार्थाची शेती करणा-या दोघा रशियन जोडप्याला अटक केली. सुमारे १५ लाखांचा अमली पदार्थासह शेती लागवडीसाठी लागणारे सामान जप्त केले. मागील सहा महिन्यात शिवोलीत गांजाच्या शेतीवर करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे. त्यावेळी सुद्धा दोन रशीयन नागरिकांना अटक करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार हणजूण पोलीस स्थानकाच्या महिला निरीक्षक लॉरीन सिक्वेरा या शिवोली येथे गस्तीवर असताना आज सकाळी ११.३० च्या सुमारास शिवोली-ताराचीभाट येथे जुन्या स्टेट बॅँकेजवळ गांजाची लागवड करण्यात येत असल्याची खबर मिळाली. त्यांनी ही माहिती निरीक्षक चेतन पाटील यांना दिल्यानंतर निरीक्षक चेतन पाटील यांनी उपअधीक्षक सेराफीन डायस आणि उत्तर गोवा अधीक्षक चंदन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल अनंत च्यारी, विशाल नाईक, जोशी, म्हामल व इतर पोलिसांसोबत धाड घातली.
यावेळी त्यांना त्या घरात वायाचेस्लार तेरेकिन (३८) आणि अॅना आशारोवा हे रशियन जोडपे सापडले. तसेच त्या घरातील एका खोलीत दोन महिन्यांची गांजाची रोपे मिळाली तसेच गांजा लागवडीसाठी व वातावरण निर्मितीसाठी लावण्यात आलेली मशीनरी आणि गांजा व एलएसडी पेपर्स सापडले. गेले वर्षभर ताराचीभाट-शिवोली येथील ज्युस्तीना फर्नांडिस यांच्या फ्लॅटमध्ये राहणा-या या जोडप्याने गांजा लागवडीसाठी एक खोली विशेष वातावरण निर्मिती करून तयार केली होती. पंचनामा केल्यानंतर सुमारे १५ लाखांचा सर्व ऐवज ताब्यात घेऊन हणजूण पोलिसांनी संशयीत वायाचेस्लार तेरेकिन व अॅना आशारोवा या दोघा रशियनांविरूद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्याखाली गुन्हा नोंद करून अटक केली असून महिला पोलीस उपनिरीक्षक लॉरीन सिक्वेरा पुढील तपास करीत आहेत.
हणजूण पोलिसांनी दहा दिवसांत अमली पदार्थ विरोधी गुन्ह्याखाली केलेली दुसरी मोठी कारवाई असून गेल्या आठवड्यात माझलवाडा हणजूण येथे अमली पदार्थ निर्मितीची रासायनिक प्रयोगशाळा उध्वस्त करून सुमारे १ करोडचा अमली पदार्थ जप्त केला होता.