नवरात्रीची वर्गणी मागितल्याने फोडले डोके; तुर्भे स्टोअरची घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 22:08 IST2022-09-24T22:08:08+5:302022-09-24T22:08:30+5:30
वर्गणी नाकारत भिकारी बोलल्याने घडला वाद

नवरात्रीची वर्गणी मागितल्याने फोडले डोके; तुर्भे स्टोअरची घटना
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : नवरात्रीची वर्गणी मागणीसाठी गेलेल्या तरुणांना भिकारी बोलल्याने झालेल्या वादातून मारहाणीची घटना घडली आहे. यामध्ये एकाचे डोके फुटले असून याप्रकरणी मेडिकल कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुर्भे स्टोअर येथे गुरुवारी रात्री हा प्रकार घडला आहे.
अरविंद चव्हाण असे जखमी तरुणाचे नाव असून तो तुर्भे स्टोअरचा राहणारा आहे. त्याच्यावर नेरूळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गुरुवारी रात्री अरविंद हा परिसरातल्या काही तरुणांसोबत तुर्भे स्टोअर परिसरात नवरात्री निमित्ताने देवीच्या स्थापनेसाठी वर्गणी मागण्यासाठी गेले होते. यावेळी सर्वजण तिथल्या प्रियांका मेडिकल मध्ये गेले असता तिथे उपस्थिताने त्यांना वर्गणी देण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. त्यानंतर तरुण पुढे जात असताना मेडिकल मधील तरुणाने त्यांना भिकारी म्हणत पुढे जाण्यास सांगितले. त्यामुळे संतप्त तरुण त्याला काढलेल्या उद्गाराबद्दल जाब विचारायला गेले असता त्याने रोडने त्यांना मारहाण केली. त्यामध्ये अरविंद चव्हाण याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मेडिकल चालकाने देखील त्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे.