सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 08:52 IST2025-07-31T08:51:43+5:302025-07-31T08:52:10+5:30
Crime MP : एका व्यक्तीने एका महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला केला. आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी महिलेचे कपडे आणि बुरखा परिधान केला होता.

सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
मध्यप्रदेशातील जबलपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने चोरीच्या इराद्याने एका महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला केला आहे. विशेष म्हणजे, आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी महिलेचे कपडे आणि बुरखा परिधान केला होता. ही घटना मंगळवारी (३० जुलै रोजी) गढा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रीकृष्ण संकुलात घडली.
नेमकं काय घडलं?
जबलपूरच्या श्रीकृष्ण संकुलातील फ्लॅट क्रमांक ७१२ मध्ये डॉ. नीलम सिंह (३५) आणि त्यांचे पती डॉ. वीरेंद्र सिंह भाड्याने राहतात. नीलम सिंह मेडिकल कॉलेज रुग्णालयात औषध विभागात कार्यरत आहेत. मंगळवारी त्या घरी एकट्या असताना आरोपी मुकुल कहारने त्यांच्यावर चाकूने सात ते आठ वार केले.
आरोपी मुकुल कहार हा रामपूर मांडवा वस्तीचा रहिवासी असून, तो पाणी वाटपाचं काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या आदल्या दिवशी मुकुलने डॉ. नीलम सिंह यांच्याकडे नोकरी किंवा कामासाठी विचारणा केली होती. मंगळवारी दुपारी त्याने महिलेचे कपडे आणि बुरखा घालून डॉ. नीलम यांच्या घरात प्रवेश केला. नीलम सिंह एकट्या असल्याचे पाहून त्याने त्यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला.
सीसीटीव्हीमध्ये कैद झाली घटना
डॉ. नीलम यांच्या किंकाळ्या ऐकून शेजारी धावले आणि त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पकडले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे, ज्यामध्ये आरोपी घरात शिरताना आणि पळून जाताना दिसत आहे. लोकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला आणि तत्काळ संजीवनी नगर पोलिसांना माहिती दिली. आरोपीकडून रक्ताने माखलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे. जखमी डॉ. नीलम सिंह यांना तात्काळ मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी दिसून आली. घटनेचं ठिकाण गढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं, पण संकुलासमोरच १०० मीटर अंतरावर संजीवनी नगर पोलीस ठाणं आहे. त्यामुळे लोकांनी आधी संजीवनी नगर पोलिसांना माहिती दिली. मात्र, त्यांच्या हद्दीत येत नसल्याचं कारण देत त्यांनी मदत करण्यास नकार दिला. गढा पोलीस ठाणं केवळ एक किलोमीटर दूर असूनही, पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला दीड तास लागला, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. रुग्णवाहिकेलाही माहिती देऊनही ती दीड तास पोहोचली नाही, त्यामुळे स्थानिक लोकांनी ऑटोमधून डॉ. नीलम यांना रुग्णालयात पोहोचवलं. यामुळे पोलीस आणि प्रशासनाविरोधात लोकांमध्ये संताप दिसून येत आहे.
या घटनेने जबलपूरमध्ये खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.