मध्य प्रदेशातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने तीन लग्न केली, मात्र त्याचे तिसरे लग्न हे त्याच्यासाठी घात करणारे ठरले. या व्यक्तीच्या तिसऱ्या पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची क्रूर हत्या केली आहे. या व्यक्तीने तिसरे लग्न केले, परंतु त्याची पत्नी लग्नानंतर एका दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. मात्र, तिच्या प्रेमाच्या वाटेत पती अडथळा ठरल्याने, तिने प्रियकराची मदत घेऊन पतीला संपवले.
या व्यक्तीच्या दुसऱ्या पत्नीने तिच्या पतीचा मृतदेह विहिरीत तरंगताना पाहिल्यानंतर या हत्येचा खुलासा झाला. पतीचा मृतदेह पाण्यात पाहून घाबरलेल्या पत्नीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी व्यक्तीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला, ज्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा तिसऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराबद्दलचे सत्य बाहेर आले.
दुसऱ्या पत्नीच्या धाकट्या बहिणीसोबत केले तिसरे लग्न!मृत व्यक्तीचे नाव भाईलाल असे असून, तो ६० वर्षांचा होता. भाईलालने त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. त्यानंतर त्याने गुड्डी नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले, परंतु गुड्डीला मुले होऊ शकली नाहीत. म्हणून भाईलालने गुड्डीची धाकटी बहीण मुन्नीशी तिसरे लग्न केले. मुन्नी आणि भाईलालला दोन मुले होती. पण, मुन्नीचे लल्लू नावाच्या एका पुरूषाशी प्रेमसंबंध जुळले होते. या लल्लूला भाईलाल आणि मुन्नीचे कुटुंब वर्षानुवर्षे ओळखत होते. कालांतराने दोघांमधील जवळीक वाढत गेली आणि दोघांनीही भाईलालपासून सुटका करून घेण्यासाठी त्याला मारण्याचा कट रचला.
तिसऱ्या पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून केली हत्याभाईलालच्या घरी बांधकाम सुरू होते. त्यावेळी तो घरात एका खाटेवर झोपला होता. रात्री २ वाजता मुन्नीने तिचा प्रियकर लल्लू आणि त्याचा मित्र धीरज कोल यांच्यासोबत भाईलालवर हल्ला केला. त्यांनी भाईलालच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर तिघांनी भाईलालचा मृतदेह ब्लँकेट आणि पोत्यात गुंडाळला व घरामागील विहिरीजवळ नेला. तिथे त्यांनी भाईलालचा मृतदेह साडी आणि दोरीने बांधला आणि विहिरीत फेकून देत तिथून पळ काढला. आता पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.