‘तो’ चालवायचा बेकायदेशीरपणे वसतीगृह; 71 बालकांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 19:25 IST2021-11-26T19:24:15+5:302021-11-26T19:25:30+5:30
Illegal Hostel : डॉक्टरसह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल

‘तो’ चालवायचा बेकायदेशीरपणे वसतीगृह; 71 बालकांची सुटका
कल्याण - दत्तक प्रक्रिया न करता बाळाची 1 लाखांना खरेदी-विक्री केल्याच्या प्रकरणात आई वडीलांसह डॉक्टर केतन सोनी याच्यावर डोंबिवलीच्या रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असताना सोनी हा कल्याणमध्ये बेकायदेशीरपणो नंदादीप फाऊंडेशनच्या नावाने अनाथ व गरजु मुलांचे वसतीगृह चालवत होत असल्याची बाब उघडकीस आली असून याप्रकरणी ठाणे जिल्हा महिला बालविकास विभागाच्या वतीने बाजारपेठ पोलिस ठाण्यात सोनी आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात आज संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित वसतीगृहातून 71 बालकांची सुटका करण्यात आली आहे. 2 ते 16 वयोगटातील बालकांना सध्या डोंबिवलीतील एका संगोपन केंद्रासह उल्हासनगर आणि भिवंडी येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
बेकादेशीरपणे बाळाची खरेदी विक्री केल्याचा गुन्हा दाखल झाल्यावर महिला बालविकास विभागाच्या वतीने अधिक माहीती घेता डॉ सोनी हा कल्याणमध्ये पारनाका, मुरलीधर आळी परिसरात नंदादीप फाऊंडेशनच्या वतीने वसतीगृह चालवित असल्याचे उघड झाले. जिल्हा महिला बाल विकास, ठाणे बाल कल्याण समिती, ठाणो चाईल्ड लाईन या विभागाच्या अधिकारी-सदस्यांनी त्याठिकाणी बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने धाड टाकली. त्यावेळेला त्याठिकाणी 29 मुले आढळुन आली. बालगृह नोंदणीचे व बालकांना संस्थेमध्ये निवासी ठेवण्यासाठीचे कोणतेही आदेश अथवा कागदपत्रे आढळुन आली नाहीत. मात्र गर्भवती महिलांचे पेपर्स व को-या कागदावर दाम्पत्यांचे अंगठे असल्याचे पेपर्स मिळून आले. मुली कुठे आहेत असे विचारले असता मुली राहत नाहीत असे उत्तर वसतीगृहाच्या कर्मचा-यांकडून देण्यात आले. दरम्यान संस्थेतील सीसीटिव्ही फुटेजमध्ये मंगळवारी रात्री 11.20 च्या दरम्यान काही मुले आणि मुलींना संस्थेपासून 10 मिनिटाचे अंतरावर असलेल्या एका जुन्या बिल्डींगमध्ये 38 बालकांना नेण्यात आल्याचे दिसून आले. त्यानुसार त्याठिकाणी धाड टाकली असता संबंधित मुले कोंडलेल्या अवस्थेत आढळुन आली.
बालकांची काळजी घेतली जात नव्हती
या संस्थेत बालकांना पुरेसे कपडे, सकस आहार दिला जात नव्हता. तसेच बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नव्हती. बालकांपैकी काही बालकांचे अंगावर त्वचा रोग झालेले असल्याचे दिसून आले.
2018 पासून याठिकाणी वसतीगृह बेकायदेशीरपणे चालविले जात आहे दरम्यान याची पुसटशी कल्पना स्थानिक पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणांना नसणो हा चर्चेचा विषय ठरला आहे. 12 ते 16 वयोगटातील 24 जण, 10 ते 16 वयोगटातील 14 मुली आणि 33 मुल-मुली 2 ते 10 वयोगटातील अशी 71 जणांची सुटका तेथून करण्यात आली आहे.