He killed his girlfriend and buried her in the wall | प्रेयसीची हत्या करून भिंतीत गाडले, कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह 

प्रेयसीची हत्या करून भिंतीत गाडले, कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह 

ठळक मुद्देएका फ्लॅटच्या भिंतीत अमिता मोहिते (३२) या तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळला आहे. तरुणीने लग्नाचा तगादा लावल्याने तिची हत्या केल्याची कबुली प्रियकराने पोलिसांना दिली. त्याने वाणगाव येथील भाडोत्री फ्लॅटच्या भिंतीत तरुणीचा मृतदेह ठेवून स्वतःच भिंतीचे बांधकाम केले होते.

बोर्डी : वाणगाव येथील वृंदावन सदनिकेतल्या एका फ्लॅटच्या भिंतीत अमिता मोहिते (३२) या तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळला आहे. प्रेमप्रकरणातून तीस वर्षीय आरोपी प्रियकर सूरज घरत (रा. बोईसर, सरावली) याने तिची हत्या केल्याची कबुली पोलीस तपासात दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे.


प्रेमविवाहासाठी घरातून पळून गेलेल्या एका बेपत्ता तरुणीचा शोध घेत असताना ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. हत्येच्या आरोपाखाली तरुणीच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मागील चार महिन्यांपूर्वी उमरोळी येथील अमिता मोहिते या तरुणीने प्रियकरासोबत प्रेमविवाह करण्यासाठी कोणालाही न सांगता घर सोडले होते. त्या दिवसांपासून तिच्या घरच्यांनी शोध सुरू केला होता. या काळात तरुणीचा प्रियकर तिच्या सोशल मीडियाच्या व्हाट्सॲप अकाउंटद्वारे तरुणीच्या कुटुंबियांशी त्यांची मुलगीच असल्याचे भासवून संपर्कात होता, मात्र तरुणीच्या कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तरुणीने लग्नाचा तगादा लावल्याने तिची हत्या केल्याची कबुली प्रियकराने पोलिसांना दिली. त्याने वाणगाव येथील भाडोत्री फ्लॅटच्या भिंतीत तरुणीचा मृतदेह ठेवून स्वतःच भिंतीचे बांधकाम केले होते. तो त्याच फ्लॅटमध्ये चार महिन्यांपासून राहत होता. या प्रकरणी पोलिसांकडून सध्या अधिक तपास सुरू आहे.

Web Title: He killed his girlfriend and buried her in the wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.