२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 06:34 IST2025-05-06T06:34:22+5:302025-05-06T06:34:33+5:30
बांगलादेशातील बिष्णूपूरचा रहिवासी असलेला शेख मजुरीचे काम करत होता. २००४ मध्ये सीमेवर जवानांची नजर चुकवून एजंटच्या मदतीने तो मुंबईत आला.

२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नदी, डोंगर पार करत मुंबई गाठलेल्या एका बांगलादेशीने नवी मुंबईतील एका महिलेशी ओळख वाढवली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी संसार थाटला, अशी माहिती कफपरेड पोलिसांच्या कारवाईतून समोर आली. लग्नाच्या काही वर्षांनंतर पती बांगलादेशी असल्याचे समजताच तिला धक्का बसला. मात्र, मुलांच्या भविष्याचा विचार करता तिने ही माहिती लपविल्याचे निष्पन्न झाले. सबूर ऊर्फ इब्राहिम रोकाला शेख (४०) असे त्या बांगलादेशीचे नाव आहे. कफपरेड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
बांगलादेशातील बिष्णूपूरचा रहिवासी असलेला शेख मजुरीचे काम करत होता. २००४ मध्ये सीमेवर जवानांची नजर चुकवून एजंटच्या मदतीने तो मुंबईत आला. नवी मुंबईत काम करताना एका महिलेशी त्याची ओळख झाली. त्याने बांगलादेशी असल्याची ओळख लपवत तिच्याशी लग्न केले. त्यांना मुले झाली. वडिलांचे निधन झाले म्हणून तो बांगलादेशला परतला. २००७ मध्ये त्याने पुन्हा मुंबई गाठली. बऱ्याच वर्षांनी तो घरी परतल्याने पत्नीला संशय आला. तिने चौकशी केली असता तो बांगलादेशी असल्याचे समजले. त्याने आधार, मतदार कार्डही बनवले.
पोलिसांच्या चौकशीत आढळली बनावट कागदपत्रे
३ मे रोजी तो कफपरेड पोलिस ठाण्याच्या आरसी चर्च परिसरात आल्याची माहिती एटीसी सेलला मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप विश्वासराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत भोसले, अंमलदार भामरे, गायकवाड यांनी सापळा रचत शेखला ताब्यात घेतले. चौकशीत कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट होताच त्याला अटक केली.
सात बांगलादेशींवर कारवाई
ट्रॉम्बे पोलिसांनी सात बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली. यामध्ये दोन कुटुंबीयांचा समावेश आहे. यातील सातही वाशीला राहण्यास होते.
पियार अली (७१), फरीद अली (३०), सुहाना
शेख (२५), मोहम्मद शेख (४०), अहमद शेख (३), अस्लम शेख (१९), मोहम्मद शेख (१९) अशी त्यांची नावे आहेत.