हवालाचा माल चोरांच्या हवाली; कोयत्याने दोघांवर वार करत वसईत १५ लाखांचा दरोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 05:37 IST2022-01-05T05:37:47+5:302022-01-05T05:37:55+5:30

वालीव पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस तपास करत आहेत. 

Hawala goods handed over to thieves; 15 lakh robbery in Vasai by attacking both with a scythe | हवालाचा माल चोरांच्या हवाली; कोयत्याने दोघांवर वार करत वसईत १५ लाखांचा दरोडा

हवालाचा माल चोरांच्या हवाली; कोयत्याने दोघांवर वार करत वसईत १५ लाखांचा दरोडा

लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : हवालाचे सुमारे १५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या दोघांवर सहा ते सात दरोडेखोरांनी कोयत्याने वार करून महामार्गावरील चिंचोटी गावाच्या हद्दीत त्यांना लुटून नेल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. वालीव पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस तपास करत आहेत. 

पेल्हारच्या दालमील कंपाऊंड येथे राहणारे पुरणसिंग राजपूत (वय ३१) आणि कारचालक प्रेमसिंग हे दोघे मालक रायसिंग राजपूत यांचे हवालाचे १४ लाख ९० हजार रुपये घेऊन सोमवारी संध्याकाळी मुंबईहून नालासोपाऱ्याला येण्यासाठी निघाले. त्यांची कार बंद पडल्याने टोईंग करून येत होते. रात्री नऊच्यासुमारास चिंचोटी गावच्या हद्दीतील सातीवली खिंडीच्या ओव्हर ब्रीजच्या पुढे आल्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन दरोडेखोरांनी दुचाकी आडवी लावली. त्याचवेळी त्यांच्या इतर चार ते पाच दरोडेखोरांनी पुरणसिंग यांच्या डाव्या हाताच्या बोटांवर कोयत्याने वार करून दुखापत केली. तसेच कारचालक प्रेमसिंग याच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर हत्याराने वार करून मारहाण केली. दरोडेखोर पैशांची बॅग आणि दोघांचे दोन्ही मोबाइल अशा एकूण १५ लाख रुपयांच्या मालाची चोरी करून पळून गेले. पुरणसिंग यांनी वालीव पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Hawala goods handed over to thieves; 15 lakh robbery in Vasai by attacking both with a scythe