संपत्तीच्या लालसेपोटी २ बहिणींची केली हत्या; संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा होता प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 13:16 IST2025-01-24T13:15:42+5:302025-01-24T13:16:24+5:30
शिक्षक छोटेलालच्या कुटुंबाला मारण्यासाठी २ लाखांची सुपारी दिली होती. त्यातील २० हजार रुपये एडवान्स देण्यात आले.

संपत्तीच्या लालसेपोटी २ बहिणींची केली हत्या; संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा होता प्लॅन
हाथरस - एका शिक्षकाच्या घरात घुसून २ सख्ख्या बहिणींची गळा दाबून हत्या करण्यात आली, त्यासोबत एका जोडप्याला गंभीर जखमी केले त्या दोन आरोपींना चकमकीत पोलिसांनी अटक केली आहे. चकमकीवेळी दोन्ही आरोपींच्या पायावर गोळ्या झाडण्यात आल्या. सध्या या दोघांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. उपचारानंतर त्यांना कोर्टात हजर करून जेलला पाठवण्यात आलं आहे. घटनेच्या २४ तासांतच दोन्ही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं.
पोलिसांच्या माहितीनुसार, शिक्षक छोटेलाल यांची संपत्ती हडप करण्यासाठी चुलत पुतण्या विकास आणि त्याचा मित्र लालूपालने संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्यासाठी २ लाखांची सुपारी दिली होती. या दुहेरी हत्याकांड घडवणाऱ्या २ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चाकू, २ पिस्तुल, कारतूस आणि रक्ताने माखलेले कपडे जप्त केलेत. या घटनेचा मास्टरमाईंड बाबूराम जो फतेहपूरचा रहिवासी असल्याचं चौकशीत समोर आले. तो शिक्षक छोटेलाल यांच्या भावाचा मुलगा आहे.
शिक्षक छोटेलालच्या कुटुंबाला मारण्यासाठी २ लाखांची सुपारी दिली होती. त्यातील २० हजार रुपये एडवान्स देण्यात आले. आग्रा येथील आशीर्वाद कॉलनीत राहणाऱ्या ४५ वर्षीय शिक्षक २० वर्षापूर्वी हाथरसला आले होते. जवाहर स्मारक इंटर कॉलेजमध्ये ते कामाला होते. छोटेलालला १ वर्षापूर्वी पॅरेलिसिस अटॅक आला होता तेव्हापासून ते अंथरुणाला खिळले आहेत. त्यांना २ मुली एक १३ वर्षीय सृष्टी आणि ७ वर्षीय विधी आहे. सृष्टी सहावीत असून विधी पहिलीत आहे. संपत्तीसाठी छोटेलालच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यात सृष्टी आणि विधी या दोघींचा जागीच मृत्यू झाला तर छोटेलाल आणि त्यांची पत्नी वीरांगना बचावली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अलीगड विभागाचे डिआयजी प्रभाकर सिंह घटनास्थळी पोहचले. एसपी चिंरजीव नाथ सिन्हा हेदेखील फॉरेन्सिक टीम आणि डॉग सक्वॉयडसह आले. पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपींच्या शोधासाठी ३ पथके बनवली. या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ आरोपींचं लोकेशन ट्रेस करत अवघ्या २४ तासांत त्यांना बेड्या ठोकल्या. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.