Radhika Yadav Murder: हरियाणातील गुरुग्राममध्ये एका बांधकाम व्यावसायिकाने टेनिसपटू मुलगी राधिका यादव (२५) हिच्या पाठीत गोळी झाडून तिची हत्या केली. राधिका स्वयंपाकघरात असताना वडिलांनी त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने तिच्यावर तीन गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, राधिकाच्या वडिलांनी आपला गुन्हा कबुल करत हत्येचे कारण सांगितले आहे.
गोळीबाराचा आवाज ऐकताच शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. राधिकाचा मृतदेह स्वयंपाकघरात रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडला होता आणि तिचे वडीलही शेजारीच बसले होते. यानंतर राधिकाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून रिव्हॉल्व्हरही जप्त करण्यात आले आहे. राधिकाच्या काकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राधिका एक टेनिस अकादमी चालवत होती, ज्यातून ती खूप पैसे कमवत होती. मात्र लोक तिच्या वडिलांना तू मुलीच्या पैशावर जगतोय असे टोमणे मारायचे. मुलगी राधिका यादव एक उत्तम खेळाडू होती. राधिकाचे वडील दीपक हे बिल्डर आहेत. चौकशीदरम्यान दीपकने सांगितले की, "राधिका एक उत्तम खेळाडू होती. तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली होती. संपूर्ण कुटुंबाला याचा अभिमान होता. मलाही राधिकाचा अभिमान होता. तीन महिन्यांपूर्वी राधिकाला खांद्याला दुखापत झाली. ही दुखापत टेनिस खेळताना झाली. तिने डॉक्टरांकडून उपचार घेतल्यामुळे तिला आराम मिळाला. परंतु मुलीने टेनिस खेळणे बंद केले. त्यानंतर राधिकाने स्वतःची अकादमी उघडली, जिथे ती मुलांना आणि मुलींना टेनिस शिकवायची."
"जेव्हा मी दूध आणायला जायचा तेव्हा लोक मला टोमणे मारायचे. ते म्हणायचे की तुझी मुलगी खूप पैसे कमवत आहे. तू मजा करत आहेस, तू तुझ्या मुलीच्या कमाईवर खर्च करत आहेस. तू आणि तुझे कुटुंब खूप मजा करत आहेस. लोकांच्या या बोलण्यामुळे मला खूप त्रास होत होता. मी राधिकाशीही याबद्दल अनेकदा बोललो होतो. मी लोकांचे टोमणे ऐकून कंटाळलो होतो. मी राधिकाला अकादमी बंद करायला सांगितले होते. आमचे कुटुंब श्रीमंत आहे, कोणतीही अडचण येणार नाही. यावर राधिका म्हणाली होती की, लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही. खेळाने माझे करिअर बनवले आहे, मग त्यातून पैसे कमवण्यात काय चुकीचे आहे," असं दीपकने सांगितले.
दीपकने चौकशीत सांगितले की, गुरुवारीही मी राधिकाला अकादमीत न जाण्यास सांगितले होते. पण, तिने ऐकले नाही. ती मला टोमणे मारू लागली. लोकांच्या टोमण्यांमुळे मी खूप अस्वस्थ झालो. अशा परिस्थितीत, जेव्हा मुलीने ऐकले नाही, तेव्हा मी माझ्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने तिच्यावर गोळी झाडली.
राधिकाच्या पाठीत तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पोलीस राधिकाच्या घरी पोहोचले तेव्हा दीपक तिथेच होता. स्वयंपाकघरात रक्त पसरले होते. दीपकला ताबडतोब ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ३२ बोअरची रिव्हॉल्व्हरही जप्त करण्यात आली. दीपकने राधिकावर गोळी झाडली तेव्हा ती स्वयंपाकघरात होती.
दरम्यान, राधिका यादव ही राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटू होती. राधिकाने अनेक आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन (ITF) आणि महिला टेनिस असोसिएशन स्पर्धांमध्ये भाग घेतला. राधिकाचे कारकिर्दीतील सर्वोच्च रँकिंग १६३८ होते. राधिकाने महिला दुहेरी प्रकारात हरियाणात पाचवे स्थान मिळवलं होतं.