७ वर्षांच्या मुलाने फोन चोरी करताना पकडवून दिलं; २ महिन्यांनी १६ वर्षांच्या मुलाने त्याचीच हत्या केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 16:29 IST2025-07-22T16:28:56+5:302025-07-22T16:29:23+5:30
हरियाणा पोलिसांनी सात वर्षीय मुलाची हत्या केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.

७ वर्षांच्या मुलाने फोन चोरी करताना पकडवून दिलं; २ महिन्यांनी १६ वर्षांच्या मुलाने त्याचीच हत्या केली
Haryana Crime: हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने सात वर्षाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केली. दोन महिन्यांपूर्वी आरोपी मुलाने एक मोबाईल चोरला होता. त्याची चोरी पीडित मुलाने पकडून दिली. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी आरोपीला माफी मागायला लावली होती. त्याचाच राग आरोपी मुलाच्या मनात होता. याच रागातून त्याने सात वर्षाच्या मुलाला संपवलं. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरु केली आहे.
गुरुग्राममध्ये एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने बदला घेण्यासाठी सात वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली. दोन महिन्यांपूर्वी, आरोपी मुलाने एका माणसाचा फोन चोरला होता. पण त्या माणसाच्या ७ वर्षांच्या मुलाने तो फोन चोरताना पाहिला. त्याने त्याच्या वडिलांना या चोरीची माहिती दिली. त्यानंतर आरोपी मुलाकडून फोन जप्त करण्यात आला. आरोपी मुलाला माफी मागण्यास सांगितले, जे त्याला आवडले नाही. त्यानंतर त्याच १६ वर्षांच्या मुलाने ७ वर्षांच्या मुलाची हत्या केली.
या प्रकरणी मृत मुलाच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. १९ जुलै रोजी जेव्हा मुलाची आई संध्याकाळी ७ वाजता घरी परतली तेव्हा तिला तिचा मुलगा सापडला नाही. तिला वाटले की तो इतर मुलांसोबत खेळत असावा. तर वडील रात्री ८ वाजता कामावर निघून गेले होते. त्यानंतर २० जुलै रोजी बस स्टँडजवळ एका मुलाचा मृतदेह आढळला. मृतदेहाच्या छातीवर आणि कपाळावर जखमांच्या खुणा होत्या. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी मृतदेहाची ओखळ पटवली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या चौकशीत आरोपीने फोन चोरल्याची कबुली दिली. सात वर्षांच्या मुलाने नावं सांगितले आणि मला माफी मागायला लागली. म्हणूनच मुलाला घराबाहेर बोलवलं. नंतर त्याच्यावर कात्रीने १८ ते २० वेळा वार केले, असं आरोपी मुलाने सांगितले. गावातील एका खोलीतून आरोपीला पकडण्यात आले. घटनास्थळावरून हत्येत वापरलेली कात्री जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी फिंगरप्रिंट, फॉरेन्सिक आणि क्राइम सीन एक्सपर्टसह घटनास्थळाची तपासणी केली.