Haryana Jalebi Baba: तंत्र-मंत्राच्या बहाण्याने 100 महिलांवर बलात्कार; हरियाणातील जलेबी बाबाला 14 वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 20:47 IST2023-01-10T20:46:57+5:302023-01-10T20:47:17+5:30
Haryana Jalebi Baba: 2018 मध्ये जलेबी बाबाचा एका महिलेवर बलात्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Haryana Jalebi Baba: तंत्र-मंत्राच्या बहाण्याने 100 महिलांवर बलात्कार; हरियाणातील जलेबी बाबाला 14 वर्षांची शिक्षा
फतेहाबाद- तंत्र-मंत्राच्या बहाण्याने महिलांना गुंगीचे औषध देऊन त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवून बलात्कार केल्याप्रकरणी जलेबी बाबाला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि जलदगती न्यायालयाचे न्यायाधीश बलवंत सिंग यांनी शिक्षा सुनावली आहे. जलेबी बाबाला दोन महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि पॉस्को कायद्यातील एका प्रकरणात दोषी धरून 14 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यात बलात्कार प्रकरणात प्रत्येकी सात वर्षे आणि आयटी कायद्यात पाच वर्षांची शिक्षा आहे, याशिवाय 35,000 रुपये दंडही ठोठावला आहे. दंड दंड न भरल्यास दोन वर्षांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.
जुलै 2018 मध्ये बाबाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो एका महिलेवर बलात्कार करताना दिसत होता. व्हिडिओ व्हायरल होताच टोहानामध्ये नाराजी पसरली आणि लोकांनी बाबाचा निषेध करण्यास सुरुवात केली. टोहाणा शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी प्रदीप कुमार यांच्या तक्रारीवरून टोहाणा पोलिसांनी 19 जुलै 2018 रोजी बाबा अमर पुरी उर्फ बिल्लुराम उर्फ जलेबी बाबा याच्याविरुद्ध बलात्कार, पॉस्को कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
यानंतर पोलिसांनी आरोपी बाबाला अटक केली आणि त्याच्या सांगण्यावरून त्याच्या घरातून अफू, पिस्तूल आणि इतर आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या. जवळपास 100 महिलांसोबत बाबाचा संबंध असल्याचा व्हिडिओही पोलिसांनी जप्त केला आहे. त्याला न्यायालयाने 5 जानेवारी रोजी दोषी ठरवले होते.