खळबळजनक! "जोपर्यंत हुंडा नाही तोपर्यंत मूल जन्माला घालायचं नाही..."; 'तिने' सांगितली आपबिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 13:08 IST2023-01-19T13:04:30+5:302023-01-19T13:08:51+5:30
गर्भवती महिलेने सासरच्या मंडळींवर छळ केल्याचा आरोप केला आहे. तिला गर्भपाताचे औषधही देण्यात आल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.

खळबळजनक! "जोपर्यंत हुंडा नाही तोपर्यंत मूल जन्माला घालायचं नाही..."; 'तिने' सांगितली आपबिती
उत्तर प्रदेशातील बांदा येथे एका गर्भवती महिलेने सासरच्या मंडळींवर छळ केल्याचा आरोप केला आहे. तिला गर्भपाताचे औषधही देण्यात आल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. त्यानंतर तिची प्रकृती इतकी बिघडली की तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा पती, सासू, सासरे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेने सांगितले की, 24 नोव्हेंबर 2022 रोजी तिचा निकाह बिसंडा पोलीस स्टेशन परिसरातील बछौदा येथील शकील याच्याशी झाला होता. सासरच्यांनी यावेळी बुलेट आणि दोन लाख रुपयांची मागणी केली. मुलीच्या वडिलांनी कसेतरी 50 हजार रुपये दिले आणि उर्वरित नंतर देण्याचे आश्वासन दिले. यानंतर मुलगी सासरी आली. काही दिवसांनी ती गरोदर राहिली. यानंतर सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला.
उरलेले पैसे आणि बुलेट दे, तरच मुलाला जन्म दे, असं सांगितले. गर्भपात करण्यासाठी दबाव आणला आणि तलाक देऊन तिला घरी पाठवण्याची धमकी दिली. महिलेने जेव्हा सासरच्या लोकांचं ऐकलं नाही तेव्हा तिला त्यांनी जेवण देणे बंद केले. 10 डिसेंबर रोजी पती, सासू, सासरे आणि वहिनी यांनी मिळून तिला जबरदस्तीने गर्भपाताचे औषध पाजले. त्यामुळे तिची प्रकृती बिघडली.
महिलेने तिच्या पालकांना माहिती दिल्यावर त्यांनी तिला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. पतीसह सहा जणांविरुद्ध महिला पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"