Handicapped person suicides after police torture | पोलीसांच्या जाचाला कंटाळून अपंग व्यक्तीची आत्महत्या
पोलीसांच्या जाचाला कंटाळून अपंग व्यक्तीची आत्महत्या

शिर्डी : येथुन जवळच असलेल्या रूई गावातील एका अपंग व्यक्तीला दोघा तरूणांनी एका गुन्ह्यात गोवले व पोलीसांनी त्रास दिल्यामुळे त्याने गळफास घेवुन आपली जीवनयात्रा संपवली. महिनाभरापासुन या प्रकारामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या या तरुणाच्या मुलीचे पंधरा दिवसांपुर्वी लग्न झाले, लग्नाच्या तयारीसाठीही तो बाहेर पडला नाही, लग्नातही गप्पच होता, त्यानंतर घरी कुणीही नसतांना त्यांनी काल गळफास आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

सुदेश प्रभाकर भारती असे या 44 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. काल, बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्या राहात्या घरी ही घटना उघडकीस आली. सुदेशचे कुटूंबिय बाहेरगावी गेलेले होते. सासुरवाडीचे लोक जेवणाचा डबा घेवुन गेले तेव्हा त्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याचे उघड झाले. आत्महत्येपुर्वी सुदेशने पोलीस अधिक्षक ईशु सिंधु, अप्पर अधिक्षक रोहिदास पवार व उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या नावे चिठ्ठी लिहुन ठेवली आहे़ आप्पासाहेब बाबुराव शिरसागर, सावळेविहीर व अन्वर मन्सुर शेख, चांदेकसारे या दोघांनी आपल्याला चोरीच्या गुन्ह्यात गोवले, एलसीबीने घरातुन काही न सांगता नेले व शिर्डी पोलीस स्टेशनचे कर्मचारी चव्हाण यांनी पत्नी अन्नपुर्णा हीला चाळीस हजार रूपये दे नाहीतर मोठ्या जेल मध्ये टाकण्याची धमकी दिल्याने पत्नीने उसणवार करून पैसे भरले असे सांगत माझ्यावर अन्याय झाला, अपंगासाठी कायदा काढला  तो कुठे गेला असा सवाल उपस्थीत करत कायदेशीर कारवाईची याचना सुदेशने चिठ्ठीत केली आहे.

सावळेविहीरच्या तरुणाला मोबाईल घ्यायचा होता त्याला सुदेशने चांदेकसाऱ्याच्या तरुणाचे नाव सांगितले. त्यानुसार सावळेविहीरच्या तरुणाने मोबाईल घेतला. पोलीसांनी पकडल्यावर सावळेविहीरच्या तरुणाने सुदेशचे नाव सांगितले. त्यानंतर नगरच्या गुन्हे अन्वेशन विभागाने त्याच्या कुटूंबाला काहीही माहिती न देता महिनाभरापुर्वी रात्री जेवतांना घरून अपहरण केल्यासारखे उचलुन नेले. पोलीसांनी त्याच्यावर आणखी गुन्हे दाखल करण्याची तसेच जेलमध्ये पाठवण्याची धमकी देवुन त्याच्या बायकोकडुन पैसे उकळले, त्यामुळे तो मानसिकदृष्ठ्या खचला होता, एका हाताने अपंग असलेला सुदेश रिक्षा चालक होता, त्यांच्या पश्चात पत्नी, एक अविवाहीत मुलगी व लहान मुलगा आहे असे माजी उपसरपंच फकीरा लोढा व सुदेशची सासु सुशिलाबाई गोसावी यांनी सांगितले.


Web Title: Handicapped person suicides after police torture
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.