लाल किल्ल्यावर दंगा करणाऱ्या मुख्य आरोपीला बेड्या; दोन तलवारी केल्या जप्त
By पूनम अपराज | Updated: February 17, 2021 16:31 IST2021-02-17T16:28:38+5:302021-02-17T16:31:50+5:30
Red Ford Voilence : लाल किल्ल्यावरील हिंसाचाराप्रकरणी आणखी एका मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

लाल किल्ल्यावर दंगा करणाऱ्या मुख्य आरोपीला बेड्या; दोन तलवारी केल्या जप्त
प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. कृषी कायद्यांना विरोध करत असलेल्या शेतकरी आंदोलकांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. मात्र, सुरुवातीलाच हे आंदोलन चिखळले. आंदोलक शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत प्रवेश करत लाल किल्ल्यावर कब्जा केला. तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला झेंडा फडकवला होता. लाल किल्ल्यावर जाऊन पोलिसांना मारहाण करण्याबरोबरच धार्मिक ध्वज फडकावला होता. लाल किल्ल्यावरील हिंसाचाराप्रकरणी आणखी एका मुख्य आरोपीला पोलिसांनीअटक केली आहे. महिंदर सिंग उर्फ मोनी (३०) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
त्याच्या स्वरूप नगर येथील घरातून पोलिसांनी ४. ३० फुटाच्या दोन तलवारी जप्त केल्या आहेत. या घटनेप्रकरणी अभिनेता यापूर्वी दीप सिद्धू याला पोलिसांनी अटक केलेली आहे. मोनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारातील मुख्य आरोपी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दिल्ली हिंसाचाराच्या घटनेपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. ३० वर्षीय मोनी याचे दिल्लीतील स्वरूप नगर येथील घर असून, त्याला पितमपुरा बस स्थानकाजवळ दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली.
दिल्ली पोलिसांकडे असलेल्या व्हिडिओत महिंदर तलवारी नाचवून हिंसाचारात सहभागी झाला असल्याचं दिसत आहे. तसेच समज विघातक घटनांना प्रवृत्त केल्याचं दिसून येत आहे. मोनीच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली. यावेळी दोन तलवारी आढळून आल्या. पोलिसांनी त्या तलवारी जप्त केल्या असून आरोपी महिंदर सिंगची चौकशी पोलिसांकडून केली जात आहेत.