साताऱ्यात ऊसाच्या शेतात अर्धवट अवस्थेतील महिलेचा मृतदेह सापडला; अंधश्रद्धेचा बळी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:32 IST2025-01-17T17:31:24+5:302025-01-17T17:32:32+5:30

नरबळीचा अंदाज : ऊसाच्या शेतात आढळला कंबरेपासून खालील भाग, विडणी येथे महिलेचा अर्धवट अवस्थेतील मृतदेह

Half-dead woman body found in sugarcane field in Satara; Victim of superstition? | साताऱ्यात ऊसाच्या शेतात अर्धवट अवस्थेतील महिलेचा मृतदेह सापडला; अंधश्रद्धेचा बळी?

साताऱ्यात ऊसाच्या शेतात अर्धवट अवस्थेतील महिलेचा मृतदेह सापडला; अंधश्रद्धेचा बळी?

कोळकी : विडणी परिसरातील २५ फाटा येथील उसाच्या शेतात एका अनोळखी महिलेचा अर्धवट अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. उसाच्या शेतात गुलाल कुंकू, दिव्याची वात, नारळ, काळी बाहुली तेथेच आढळून आल्याने अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली.

फलटण तालुक्यातील विडणी येथील २५ फाटा परिसरात प्रदीप जाधव यांचे उसाचे शेत आहे. निर्मनुष्य ठिकाणी काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने एका महिलेचा खून करून मृतदेह उसाच्या शेतात टाकून फरार झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित मृतदेह अर्धवट तसेच सडलेला आहे. हिंस्र प्राण्यांनी कबरेपासून सडलेला भाग उसाच्या शेतातून बाहेर ओढून आणला. तेव्हा शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

पोलिस पाटील शीतल नेरकर यांनी घटनेची माहिती फलटण ग्रामीण पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राहुल धस, पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, पोलिस उपनिरीक्षक मच्छींद्र पाटील, शिवाजी जायपत्रे, शिवानी नागवडे यांनी भेट देऊन परिसरातील उसाच्या शेतात पाहणी केली.

नारळ, गुलाल अन् कापलेले केस

ऊसाच्या शेतात काही अंतरावर नारळ, गुलाल, महिलेचे केस कापलेले, तेलाचा दिवा, काळी बाहुली, सुरी आढळून आली. त्यामुळे हा प्रकार नरबळी असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळाचा फलटण ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला आहे.

कवटी पाटात; मधल्या भागाचा शोध सुरू

महिलेचे कबरेपासून खालचे धड वेगळे होते. तर कवटी दोनशे-तीनशे मीटर अंतरावर पाण्याच्या पाटात आढळून आली. मधल्या धडाचा पोलिस तपास घेत आहेत.

ऊस तोडण्याच्या सूचना

घटनास्थळी पोलिसाचा फौजफाटा बोलविण्यात आला होता. जवळपास ९-१० एकर उसाचे क्षेत्र असून पोलिसांनी मृतदेहाचा बाकीचा भाग इतर पुरावा मिळून येतोय का यासाठी परिसर पिंजून काढला. पुरावा शोधण्यासाठी आसपासचा ऊस तोडण्यासाठी संबंधित कारखान्यास सूचना केल्या आहेत.
 

Web Title: Half-dead woman body found in sugarcane field in Satara; Victim of superstition?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.