वसईतील पुजेच्या दुकानात 3 लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 19:31 IST2020-10-18T19:30:32+5:302020-10-18T19:31:03+5:30
Vasai Crime News : दुकानातील विविध बॉक्समध्ये विमल, रजनीगंधा आदी कंपनीचा गुटखा सापडला.

वसईतील पुजेच्या दुकानात 3 लाखांचा गुटखा जप्त
वसई - वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आनंदनगर येथे पूजेचे साहित्य विक्री होत असलेल्या दुकानात विक्रीसाठी बंदी असलेला विविध कंपनीचा गुटख्याचा साठा अनैतिक मानवी प्रतिबंध शाखेच्या पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसईतील आनंद नगर भागातील एका इमारतीत पारस आर्ट हेंडीक्राफ्ट नावाचे पुजेचे विविध प्रकारचे साहित्य मिळणारे दुकान कार्यरत आहे मात्र याच दुकानातील साहीत्य व विविध बॉक्समध्ये राज्यात विक्रीसाठी बंद असलेला जीवघेणा गुटखा व त्याची पाकिटे असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेच्या पोलिसांना मिळाली असता त्यांनी शनिवारी रात्री उशिरा 10.30 च्या सुमारास या दुकानात छापा टाकला आणि या छाप्यात या पथकाला पूजेसाठी विक्री होत असलेल्या या दुकानातील विविध बॉक्समध्ये विमल, रजनीगंधा आदी कंपनीचा गुटखा सापडला. दरम्यान या गुटख्याची साधारणपणे बाजारात किंमत तीन लाखांच्या आसपास असू शकेल.
या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेच्या पोलिसांनी एकास ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. तर हा गुटखा इतक्या मोठ्या प्रमाणावर कुठून व कसा वसईत आला याउलट लॉकडाऊन काळात ही हा गुटखा कोणाला विक्री केला अशी नानाविध प्रश्नांची उकल आता या पोलिसांना यातील सहभागी आरोपीकडून घायची आहेत. अर्थातच पुजेच्या साहित्य विक्री आड होत असलेल्या दुकांनावर अशा प्रकारची धडक कारवाई करणाऱ्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा पोलिसांच्या कामगिरीचे सर्वास्तरावरून कौतुक होत आहे.