करावेमधून 20 लाखाचा गुटखा जप्त, एकाला अटक; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 20:09 IST2021-07-06T19:34:06+5:302021-07-06T20:09:21+5:30
Gutka worth Rs 20 lakh seized from Karave : नवी मुंबई पोलीसांकडून अमली पदार्थ विरोधी कारवायांवर जोर देण्यात येत आहे.

करावेमधून 20 लाखाचा गुटखा जप्त, एकाला अटक; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
नवी मुंबई - अमली पदार्थ विरोधी पथकाने करावे येथून 20 लाखाचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, त्याने विक्रीसाठी या गुटख्याची साठवणूक केली होती.
नवी मुंबई पोलीसांकडून अमली पदार्थ विरोधी कारवायांवर जोर देण्यात येत आहे. त्याकरिता आयुक्तालय क्षेत्रात नशा मुक्ती अभियान राबवले जात आहे. त्याअंतर्गत अमली पदार्थ विक्रेत्यांसह नशा करणाऱ्यांवर कारवाई केल्या जात आहेत. त्यानुसार अमली पदार्थ विक्रेत्यांच्या शोधात नवी मुंबई पोलीस आहेत. यादरम्यान करावे गाव परिसरात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्याद्वारे वरिष्ठ निरीक्षक जयराज छापरिया यांनी पोलीस निरीक्षक अश्विनी कुसूरकर, सहायक निरीक्षक विजय चव्हाण, हवालदार कासम पिरजादे, इकबाल शेख, महेश शेट्टे, तुकाराम सूर्यवंशी, राजेश सोनावणे, राहुल वाघ, देवमन पवार यांचे पथक केले होते. त्यांनी मंगळवारी दुपारी करावे सेक्टर 36 येथील लक्ष्मी किराणा स्टोअर या दुकानावर छापा टाकला. त्यामध्ये दुकानात व दुकानदार राजूराम आसाराम देवासी याच्या घरातून तब्बल 20 लाख 46 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. सदर गुटखा जप्त करून देवासी विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.