Gun fire over a cricket dispute in Bhiwandi | भिवंडीत क्रिकेटच्या वादातून एकावर गोळीबार

भिवंडीत क्रिकेटच्या वादातून एकावर गोळीबार

- नितिन पंडीत

भिवंडी - भिवंडीत सेनेच्या शाखाध्यक्षासह एका महिलेवर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतांनाच क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मैदानाकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने गाडी मागे घेण्यावरून झालेल्या वादातून एकावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील पायगाव गावात शनिवारी सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला आहे का त्यानुषंगाने देखील पोलीस तपास करीत आहेत.

प्रफुल तांगडी असे या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून पायगाव येथे फोर्टी प्लस क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते . मात्र या क्रिकेट ग्राऊंडकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने जखमी व हल्लेखोर यांच्या गाड्या समोरासमोर आल्या असता गाड्या मागे घेण्यावरून दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली .

'' आधी तू गाडी मागे घे , आधी तू गाडी मागे घे '' अशी जोरदार बाचाबाची झाल्यांनतर या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले व त्यांनतर एका तरूणानाने चक्क प्रफुल याच्यावर रिव्हॉल्वर ने पाच राउंड फायर केले . या गोळीबारात प्रफुल गंभीर जखमी झाला असून त्याच्या छातीवर , पोटावर व हातावर तीन गोळ्या लागल्या असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते . त्यास उपचारासाठी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . तर गोळीबार करणारा हल्लाखोर तरुण फरार झाला असून भिवंडी तालुका पोलीस त्याचा कसून शोध घेत असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी दिली आहे .

दरम्यन भिवंडीत लागोपाठोपाठ गोळीबाराच्या घटना घडत असल्याने हल्लेखोरांजवळ हे अवैध रिव्हॉल्वर येतातच कुठून असा प्रश्न सुद्न्य नागरिकांना पडला असून पोलीस प्रशासन याविरोधात कठोर भूमिका का घेत नाहीत असा सवाल देखील उपस्थित होत आहे.

Web Title: Gun fire over a cricket dispute in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.