हृदयद्रावक! ऑनर किलिंगने गुजरात हादरलं, प्रेमप्रकरणामुळे संतापलेल्या वडिलांनी मुलीला संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 11:45 IST2025-03-14T11:44:17+5:302025-03-14T11:45:30+5:30
एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

हृदयद्रावक! ऑनर किलिंगने गुजरात हादरलं, प्रेमप्रकरणामुळे संतापलेल्या वडिलांनी मुलीला संपवलं
गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वडिलांनी आपल्या १९ वर्षांच्या मुलीची हत्या केली कारण ती दुसऱ्या जातीतील मुलावर प्रेम करत होती. या हत्येत वडिलांना त्यांच्या भावानेही साथ दिली. दोघांनी मिळून मुलीवर गुपचूप अंत्यसंस्कार केले. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
पोलिस उपअधीक्षक मिहिर बरैया यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडील दीपक राठोड हे आपल्या मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे खूप नाराज होते, संतापले होते. रागाच्या भरात त्यांनी आपल्या मोठ्या मुलीचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर, धाकट्या मुलीलाही धमकी देण्यात आली की, जर तिने तिच्या बहिणीसारखं काही केलं तर तिच्याबाबतही असंच होईल.
मृतदेहावर घाईघाईने केले अंत्यसंस्कार
हत्येनंतर, दीपक राठोडने त्याचा भाऊ लालजी राठोडच्या मदतीने, कोणालाही संशय येऊ नये म्हणून गावातील स्मशानभूमीत मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार केले. नातेवाईकांनी मुलीबद्दल विचारणा केली तेव्हा आरोपीने सांगितलं की तिने विष प्राशन केलं आहे. पण सविस्तर विचारपूस केली असता, दीपक समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे नातेवाईकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलीस तपासात सत्य समोर
माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आणि चौकशीदरम्यान दीपक आणि त्यांच्या भावाच्या जबाबात अनेक विरोधाभास आढळून आले. यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. अधिकाऱ्यांचं म्हणणे आहे की हे प्रकरण ऑनर किलिंगशी संबंधित आहे जिथे कुटुंबाची इज्जत वाचवण्याच्या नावाखाली एका निष्पाप मुलीची हत्या करण्यात आली.
समाजात ऑनर किलिंगच्या घटनेत वाढ
प्रेमप्रकरणातून अशा निर्घृण हत्याकांडाची ही पहिलीच घटना नाही. देशभरात ऑनर किलिंगच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जिथे कुटुंबं फक्त लोक काय म्हणतील यासाठी स्वतःच्या मुलांनाच मारत आहेत. अशा घटना समाजात चिंतेचा विषय बनत आहेत आणि यावर कठोर कायदे लागू करण्याची गरज आहे. सध्या पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत असून आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.