मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 13:47 IST2025-12-23T13:46:44+5:302025-12-23T13:47:34+5:30
अभिषेकच्या घरासमोरच सोनल सिंह तिचा पती अजित सिंहसोबत राहत होती.

फोटो - आजतक
बीटेक आणि एमबीए पदवी घेतलेला गोंडा येथील ३२ वर्षीय अभिषेक श्रीवास्तवने आपल्याच घरात टोकाचं पाऊल उचललं. १७ डिसेंबरच्या दुपारी जेव्हा बराच वेळ अभिषेकने दरवाजा उघडला नाही, तेव्हा त्याच्या बहिणीला काहीतरी अघटीत घडल्याची शंका आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दरवाजा तोडला. आतील दृश्य पाहून सर्वांचा थरकाप उडाला.
अभिषेकचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता, तोंडात कपडा कोंबला होता, हात बेल्टने बांधलेले होते. पण या सर्वांपेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याच्या खोलीच्या भिंती होत्या. तिथे एका महिलेचे अनेक फोटो, मोबाईल चॅट्सचे स्क्रीनशॉट्स आणि लिहिलेली काही पानं चिकटवली होती. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
कोण होता अभिषेक श्रीवास्तव?
अभिषेक गोंडा नगरातील गायत्रीपुरम परिसरात आपल्या धाकट्या बहिणीसोबत राहत होता. त्याचे आई-वडील, जे व्यवसायाने वकील होते, त्यांचे पूर्वीच निधन झालं होतं. अभ्यासात हुशार असलेल्या अभिषेकने बीटेक आणि त्यानंतर एमबीए केलं होतं आणि तो एका पेंट कंपनीत नोकरी करत होता. आई-वडिलांच्या पश्चात घर आणि त्याची बहीण हेच त्याचे संपूर्ण जग होते.
ओळखीचं रूपांतर प्रेमात
अभिषेकच्या घरासमोरच सोनल सिंह तिचा पती अजित सिंहसोबत राहत होती. सोनलचा पती रोज सकाळी कामावर निघून जायचा आणि अभिषेकची बहीणही शाळेत शिकवण्यासाठी जायची. घरात अनेकदा अभिषेक एकटाच असायचा. अभिषेकचा चुलत भाऊ उद्धव श्रीवास्तवने सांगितलं की, अभिषेकने आपल्या घराबाहेर त्याचं नाव आणि मोबाईल नंबर लिहिला होता. याच नंबरच्या माध्यमातून सोनलने त्याच्याशी संवाद सुरू केला. आधी सामान्य बोलणं, मग विचारपूस आणि हळूहळू जवळीक वाढत गेली. काही काळातच या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. अभिषेक सोनलवर विश्वास ठेवू लागला. त्याने तिला महागड्या भेटवस्तू ऑनलाइन पाठवल्या आणि पैशांची मदतही केली.
वादाची ठिणगी पडली अन्...
उद्धवच्या म्हणण्यानुसार, काही काळानंतर परिस्थिती अचानक बदलू लागली. सोनलचा पती अजितने अभिषेकच्या घरासमोर कचरा फेकण्यास सुरुवात केली. अभिषेकने याला विरोध केला आणि आपल्या बाउंड्री वॉलवर 'येथे कचरा टाकू नका' असे लिहून घेतलं. इथूनच वादाची ठिणगी पडली. नात्यातील गोडवा हळूहळू कमी झाला. यानंतर जे घडलं, त्याने अभिषेकचं आयुष्य पूर्णपणे कोलमडून गेलं.
अभिषेकवर खोटे आरोप
सोनल आणि तिच्या पतीने मिळून अभिषेकवर खोटे आरोप केले आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला, असा आरोप उद्धवने केला आहे. परिणामी, अभिषेकला जेलमध्ये जावं लागले. सुमारे १० दिवसांनंतर तो जामिनावर बाहेर आला, पण जेलमध्ये जावं लागल्यामुळे झालेली बदनामी त्याच्यासाठी मोठा धक्का होता. एक सुशिक्षित, नोकरी करणारा युवक, ज्याचा कधीही कायद्याशी संबंध आला नव्हता, तो समाजात स्वतःला गुन्हेगार समजू लागला होता.
स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करण्याचा शेवटचा मार्ग
जेलमध्ये गेल्यामुळे अपमान, सतत होणारं ब्लॅकमेलिंग आणि मानसिक दबाव यामुळे अभिषेक खचला होता. त्याने हे उघडपणे कोणासमोर कबूल केलं नाही, परंतु त्याच्या खोलीच्या भिंती त्याच्या दुःखाच्या साक्षीदार आहेत. मृत्यूपूर्वी त्याने सोनलसोबतचे त्याचे चॅट्स, तिचे फोटो आणि स्क्रीनशॉट काढले आणि भिंतींवर चिकटवले. स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करण्याचा हा त्याचा शेवटचा मार्ग होता.