भाई सब गोल माल है! सीमाशुल्क विभाग कार्यालयातूनच १ कोटीचं १० लाखांचं सोनं गायब
By प्रविण मरगळे | Updated: December 19, 2020 09:18 IST2020-12-19T09:17:55+5:302020-12-19T09:18:56+5:30
२०१६ मध्ये भुज ऑफिसची दुरुस्ती केली असता भुज सीमाशुल्क विभागाने जामनगर कार्यालयातून सीलबंद सुटकेस ताब्यात घेतली.

भाई सब गोल माल है! सीमाशुल्क विभाग कार्यालयातूनच १ कोटीचं १० लाखांचं सोनं गायब
अहमदाबाद – गुजरातमधील जामनगर येथील सीमाशुल्क विभागाच्या कार्यालयातून १ कोटी १० लाख रुपयांचे सोने गहाळ झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीमाशुल्क विभागाच्या अज्ञात कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, चार वर्षांची अंतर्गत चौकशी ही कारवाई करण्यात आली आहे.
काय प्रकरण आहे?
जामनगर बी विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे सोने भुज सीमाशुल्क विभागाचे होते, हे २००१ च्या भूकंपानंतर जामनगर कार्यालयात ठेवण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुज कार्यालय जेव्हा हे सोने ताब्यात घेण्यासाठी गेले असता १ कोटी १० लाख रुपयांचे २,१५६.७७ ग्राम सोनं गायब झाल्याचं आढळून आलं, यानंतर अंतर्गत तपासणीसाठी विभागात एफआयआर दाखल करण्यात आला.
सोनं गायब कसं झालं?
पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार २००१ मध्ये कच्छच्या भुज सीमाशुल्क विभागाने भूकंपात इमारत कोसळल्यानंतर तब्बल ३,१४९.३९८ ग्राम सोनं जप्त करत ते जामनगर सीमाशुल्क विभागाकडे सुरक्षित ठिकाणी सोपविण्याचा निर्णय घेतला. यानंतर सोन्याला दोन सुटकेसमध्ये ठेवून जामनगर कस्टम विभागाच्या कार्यालयात ठेवले.
२०१६ मध्ये भुज ऑफिसची दुरुस्ती केली असता भुज सीमाशुल्क विभागाने जामनगर कार्यालयातून सीलबंद सुटकेस ताब्यात घेतली. पण त्यानंतर सुटकेसच्या चाव्या हरवल्या गेल्या. अशा परिस्थितीत दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुटकेसचे कुलूप तोडण्यात आले. त्यानंतर असा दावा केला गेला की, या काळात ३ हजार १४९ किलो सोन्यापैकी २ हजार १५६ किलो सोनं हरवलं आहे. अधिकाऱ्यांना सोन्याची चोरी झाल्याचा संशय आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.