एअरपोर्टवर प्रवाशाच्या चपला पाहून अधिकाऱ्यांना संशय; शिलाई काढताच सारेच अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 13:30 IST2022-01-25T13:29:16+5:302022-01-25T13:30:29+5:30
सोनं तस्करीचा प्रयत्न उधळला; कालिकत विमानतळावरून एका प्रवाशाला अटक

एअरपोर्टवर प्रवाशाच्या चपला पाहून अधिकाऱ्यांना संशय; शिलाई काढताच सारेच अवाक्
विमानतळावर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांमुळे सोन्याच्या तस्करीचा डाव उधळला गेला आहे. केरळच्या कालिकत विमानतळावर एकाला अटक करण्यात आली आहे. चपलेतून सोन्याची तस्करी करणाऱ्याला विमानतळावर अचक करण्यात आली.
सोन्याच्या तस्करीसाठी विविध मार्गांचा वापर केला जातो. दुबईहून कालिकत विमानतळावर दाखल झालेल्या एका व्यक्तीची अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्याच्याकडे असलेलं सामान तपासण्यात आलं. मात्र काहीही आढळून आलं नाही. तितक्यात अधिकाऱ्यांचं लक्ष त्याच्या चपलांकडे गेलं. त्याच्या चपलांची शिलाई काहीशी वेगळी दिसत होती. शिलाई नुकतीच करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं.
अधिकाऱ्यांनी प्रवाशाला चप्पल काढण्यास सांगितलं. त्यांची शिलाई काढण्यात आली. त्यातून एक लिफाफा हाती लागला. त्यामध्ये प्लास्टिकची दोन पाकिटं हाती लागली. त्यात सोन्याची दोन-दोन नाणी होती. दोन्ही चपलांमध्ये अधिकाऱ्यांना सोन्याची नाणी सापडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.