गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 15:25 IST2025-09-13T15:22:38+5:302025-09-13T15:25:50+5:30
एका १९ वर्षीय तरुणाने प्रेमात अपयश आल्याने स्वतः संपवण्याचा प्रयत्न केला.

AI Generated Image
मध्यप्रदेशच्या इंदूर शहरात प्रेमभंगाची एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय तरुणाने प्रेमात अपयश आल्याने स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला, ज्यात तो उपचारादरम्यान अपयशी ठरला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या तरुणाने आत्महत्येसाठी एकापाठोपाठ तीन वेगवेगळे प्रयत्न केले, ज्यामुळे या घटनेची तीव्रता आणि तरुणाईच्या मानसिक स्थितीची भयाणता पुन्हा एकदा समोर आली आहे.
ही घटना इंदूरमधील हिरा नगर भागात घडली. हर्ष नावाचा हा तरुण एका मुलीच्या प्रेमात होता. मात्र, काही दिवसांपूर्वी त्या मुलीने त्याच्याशी बोलणं पूर्णपणे थांबवलं. तिने त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला आणि त्यांच्यातील सर्व चॅट्सही डिलीट केले. यामुळे हर्ष खूप निराश झाला आणि नैराश्यातून त्याने गुरुवारी रात्री टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
आत्महत्येच्या प्रयत्नांत त्याने आधी स्वतःच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केला. पण, त्यात तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर त्याने हाताची नस कापून जीव देण्याचा प्रयत्न केला. दोन्ही प्रयत्नांमध्ये त्याला यश न आल्याने, अखेरीस त्याने विषारी औषध प्यायले. विषामुळे त्याला असह्य वेदना होऊ लागल्या आणि तो वेदनेने मोठ्याने ओरडू लागला.
त्याचा आवाज ऐकून घरात झोपलेले त्याचे कुटुंबीय जागे झाले. त्यांनी पाहिले की, हर्ष रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता आणि त्याला उलट्या होत होत्या. कुटुंबीयांनी तात्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही हर्षला वाचवता आले नाही. उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणात हर्षचा जबाब नोंदवला आहे. ज्यात त्याने मुलीच्या वागण्यामुळेच हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगितलं. पोलिसांनी त्याचा मोबाईल फोन जप्त केला असून, अधिक तपास करत आहेत.